Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

पोईसर नदीच्या पात्रात अडथळा ठरणारी १६ बांधकामे हटविली


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असणा-या विविध नद्यांपैकी पोईसर नदी ही एक महत्त्वाची नदी आहे. शुक्रवारी पहिल्या टप्प्यात या नदीच्य़ा पात्रात अडथळा ठरणा-य़ा १६ बांधकामांवर पालिकेने कारवाई केली. येथील सुमारे १३० बांधकामे हटवावी लागणार आहे. यातील पावसापूर्वी आणखी २९ बांधकामे हटवली जाणार आहेत. त्यामुळे नदीच्या किनारी पावसापूर्वी संरक्षक भिंत बांधण्यासाठी येणारी अडचण आता दूर झाली असल्याची माहिती उप आयुक्त उल्हास महाले यांनी दिली.

पोईसर नदी महानगरपालिकेच्या ‘आर दक्षिण’ विभागात कांदिवली (पश्चिम) परिसरातील मंगूभाई दत्ताजी पुलाच्या जवळ असणा-या लालजी पाडा परिसरातून वाहते. पावसाळ्यात अतिवृष्टी दरम्यान नदीलगतच्या परिसरात पाणी भरण्याची शक्यता असते. त्यामुळे येथे केल्या जाणा-या उपाययोजनांमध्ये नदीच्या किनारी संरक्षक भिंत बांधण्याचाही समावेश आहे. मात्र, ही भिंत बांधण्यात येथील अनधिकृत झोपड्यांचा अडथळा ठरत होता. ही बाब लक्षात घेऊन शुक्रवारी सकाळपासून येथील बांधकाम हटवण्याचे काम सुरु करण्यात आले. पहिल्या टप्प्यात १६ अनधिकृत बांधकामे, झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान स्थानिकांनी पालिकेच्या पथकाला सहकार्य केले असेही महाले यांनी सांगितले.

पोईसर नदीकाठी संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे. यासाठी सदर परिसरातील सुमारे १३० बांधकामे हटवावी लागणार आहे. यासाठी कारवाई सुरु झाली आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी ज्या भागात भिंत बांधणे गरजेचे आहे, अशा भागातील २९ बांधकामे पहिल्या टप्प्यात हटविण्यात येणार आहेत. या २९ बांधकामांपैकी १६ बांधकामांवर पालिकेने कारवाई केली. उर्वरित १३ बांधकामे देखील हटविण्यात येणार आहेत. ही बांधकामे हटविल्यानंतर संरक्षक भिंतीचे बांधकाम पालिकेतर्फे सुरु करण्यात येणार आहे.

कारवाईसाठी मुंबई पोलीस दलातील २० कर्मचारी घटनास्थळी तैनात होते. तसेच महानगरपालिकेचे ७५ कामगार – कर्मचारी - अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित होते. जे. सी. बी., पोकलेन यासारख्या यंत्रसामुग्रीचा वापरही या कारवाईदरम्यान करण्यात आला असे सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom