राज्यभरातील परिचारिका आंदोलन तीव्र करणार

0


मुंबई - विविध मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी रुग्णालये आणि दवाखान्यातील परिचारिकांनी शनिवारपासून बेमुदत आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला. हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय परिचारिकांच्या संघटनेने घेतला आहे. सोमवारी आझाद मैदानात कामबंद आंदोलन केले जाणार आहे. यात राज्यभरातील परिचारिका सहभागी होणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. दरम्यान आंदोलनाचा रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होऊ नये म्हणून शिकाऊ परिचारिका आणि डॉक्टर्स यांच्या मदतीने काम सुरळीत पार पाडले जात असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

कंत्राटी नियुक्त्या आणि प्रशासकीय बदल्या आदी मागण्यांबाबत सरकारकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. याकडे दुर्लक्ष झाल्याने शनिवारी, २८ मेपासून बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात राज्यभरातील परिचारिकांनी सहभाग घेतला आहे. जेजे रुग्णालयातील सुमारे ७००, जीटी ३००, सेंटजॉर्ज रुग्णालयातील २५० परिचारिका आंदोलनात उतरल्या आहेत. त्यामुळे याचा आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. परिचारिकांनी आंदोलनात सहभाग घेतल्याने जेजेतील नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती संघटनेने दिली.

नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या -
आंदोलनात परिचारिकांनी सहभाग घेतल्याने रुग्णसेवेवर परिणाम दिसून येतो आहे. मुंबईत जे.जे. रुग्णालयात रोज सुमारे १०० शस्त्रक्रियांपैकी केवळ २० ते २३ अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जे.जे. रुग्णालयाशी संलग्न जी.टी. आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयात अंदाजे ३० ते ४० शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवसापासून रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचे चित्र आहे.

आझाद मैदानात कामबंद आंदोलन -
शनिवारपासून राज्यभरातील परिचारिकांनी बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात परिचारिकांचा पाठिंबा मिळतो आहे. आंदोलनाची अद्याप दखल घेण्यात न आल्याने सोमवारी आझाद मैदानात कामबंद आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले जाणार असल्याची माहिती राज्य परिचारिका संघटनेने दिली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)