आता भलतेच भोंगे ऐकू येतात - उध्दव ठाकरे

JPN NEWS
0


मुंबई - कोरोनाच्या काळात रुग्णवाहिकांचे भोंगे ऐकू येत होते, मात्र आता भलतेच भोंगे ऐकायला येत आहेत. असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. कोरोना काळात केलेल्या कामाविषयी ' इक्बाल सिंग चहल - कोविड वॉरियर' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात झाले. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, कोरोनाचा काळ पुढे इतिहास जमा होईल, त्या काळात आपण काय करीत होता, याचे डॉक्युमेंटेशन या पुस्तकातून होईल. ही पुस्तके काही जणांना फुकट घरपोच वाटण्याची गरज आहे, असा विरोधकांचा खरमरीत समाचारही त्यांनी घेतला. मला मुख्यमंत्री पदाचा आणि कोरोनाचाही अनुभव नव्हता, दोन वर्षापूर्वी सर्व प्रार्थना स्थळे बंद होती, तेव्हा रुग्णवाहिकांचे भोंगे ऐकू येत होते, मात्र आता भलतेच भोंगे ऐकायला येत आहेत, अशी भोंग्यांच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विरोधकांवर टीका केली. कोविड विषाणू महामारीच्या संकटात मुंबईत आयुक्तांपासून ते सफाई कामगारांपर्यंत सर्वांनीच न खचता काम करुन कोविडविरुद्ध लढा दिला. या काळात ज्या विविध उपाययोजना करुन कोविड नियंत्रणात आणला त्या 'मुंबई मॉडेल' ची या पुस्तकात आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. प्रसिद्ध लेखक मिनाझ मर्चंट यांनी इक्बाल सिंग चहल - कोविड वॉरियर' हे पुस्तक शब्दबध्द केले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोविडचा काळ हा कसोटीचा काळ होता. कोविडशी लढण्याचा जगाला अनुभव नव्हता. कोविडवर उपचार नव्हता तरी त्याचे व्यवस्थापन करु शकत होतो अशी परिस्थिती होती. मार्च २०२० मध्ये कोविड केंद्र सुरु करण्याच्या सूचना दिल्या आणि वांद्रे कुर्ला संकुलात देशातील पहिले जम्बो कोविड रुग्णालय केवळ पंधरा दिवसात महानगरपालिकेने सुरु केले, अजूनही हे रुग्णालय तसेच ठेवले असून या ठिकाणी कायमस्वरुपी पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणाची सुविधा निर्माण केली आहे. विविध उपाययोजना करणे हे एक सांघिक काम होते, या संपूर्ण अधिकारी-कर्मचाऱ्यांवर विश्वास टाकून त्यांच्यात हिंमत जागवली, त्यावेळी या सर्वांनी अतिशय अवघड काम केले. एक कॅप्टन म्हणून त्यांच्यात आत्मविश्वास जागवण्याचे काम आपण केले असेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

लॉकडाऊनच्या काळात मजूर घरी जाण्यासाठी पायी निघाले, रस्त्याने जाणाऱ्या या मजूरांना अन्नाची पाकिटे दिली. केंद्राकडे गाड्यांना परवानगी देण्याची मागणी केली, अतिशय झोप उडवणारा हा काळ होता. अर्थचक्र पुर्ववत करण्यासारखे अनेक प्रश्न होते, ऑक्सिजनचा पुरवठा होत नव्हता, अशावेळी ऑक्सिजनच्याअभावी एकही मृत्यू होणार नाही याची दक्षता महानगरपालिकेने घेतली आणि ऐन ऑक्सिजनच्या टंचाईत दीडशे रुग्णांना स्थलांतरित केले त्यामुळे मोठी हानी आपण टाळू शकलो, असे ते म्हणाले. यावेळी लेखक मिनाझ मर्चंट, 'महारेरा' चे अध्यक्ष अजोय मेहता यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांचेसह मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, डॉ. संजीव कुमार, पी. वेलारासू आदी उपस्थित होते.

धारावीचे जगभरात कौतुक -
धारावीमध्ये कोविड नियंत्रणात आणला त्याचे जगभरात कौतुक झाले. रुग्णालये, खाटांचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका अशा अनेक उपाययोजना केल्या. बोलणे आणि कृती यातील अंतर कमी केले म्हणून कोविडची यशोगाथा आपण या पुस्तकाद्वारे जगासमोर मांडू शकलो असे सांगून कोविडकाळात महापालिका, बेस्ट आणि सर्व यंत्रणांनी न खचता केलेल्या कामाचे ठाकरे यांनी कौतुक केले.

'मुंबई मॉडेल' ची सविस्तर माहिती या पुस्तकात -
'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' सारख्या मोहिमेमुळे ३५ लाख कुटुंबांपर्यंत महानगरपालिका पोहोचली. रुग्णाला थेट कोविड अहवाल न देता प्रभाग कार्यालयाच्या माध्यमातून हा अहवाल देणारे मुंबई हे जगातील एकमेव शहर असून सुमारे पावणेअकरा लाख कोविड अहवाल दिले. धारावी पॅटर्न, रुग्णवाहिका, १४४ खाजगी रुग्णालयांना महापालिकेच्या डॅशबोर्डवर आणणे, ऑक्सिजन सुविधा, लसीकरणावर भर आदी स्वरुपाची असंख्य कामे या काळात झाली. 'मुंबई मॉडेल' ची सविस्तर माहिती या पुस्तकात दिली आहे, असे पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !