१ सप्टेंबरपर्यंत खड्डे न बुजवल्यास स्कूल बस बंद

Anonymous
0


मुंबई - सध्या मुंबईतील रस्त्यांवर जागोजागी खड्डे असल्याने वाहन चालकांना स्कूलबस चालवणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे स्कूल बस चालक- मालक आक्रमक झाले आहेत. येत्या १ सप्टेंबरपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा खड्डे असणा-या भागांतील स्कूल बस तात्पुरत्या बंद केल्या जातील असा इशारा स्कूल बस चालक - मालक संघटनेकडून देण्यात आला आहे.

पावसाळा सुरु झाल्यानंतर मुंबईतील रस्ते खड्डेमय झाले आहेत. खड्डे असलेल्या रस्त्यांवरून स्कूलबस चालवण्यासाठी चालकांना कसरत करावी लागते आहे. मुंबईत सुमारे ८ हजार स्कूलबस आहेत. वाहन चालकांना रस्त्यावरील खड्डे चुकवताना जिकरीचे जाते आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्वाची असल्याने रस्ते खड्डेमय होणे संबंधित प्रशासनाची जबाबदारी आहे. याकडे पालिका, सरकारचे लक्ष वेधूनही याकडे दुर्लक्ष झाल्याने स्कूलबस संघटना आक्रमक झाली आहे. रस्त्यावर ख़डडे असल्याने विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत सोडणे अनेकवेळा शक्य होत नाही. शाळेत पोहचण्यासाठी पाऊण तास लागत होता तो आता दीड तासाहून अधिक वेळ लागत असल्याने पालकांच्या तक्रारी वाढत आहेत.

प्रशासनाकडूनही सकारात्मक उत्तर मिळत नसल्याने आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे स्कूल बस असोसिएशनचे अनिल गर्ग यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षा महत्वाची असल्याने रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा अन्यथा १ सप्टेंबर नंतर स्कूल बस तात्पुरत्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यास आला असल्याची माहिती गर्ग यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)