नवी दिल्ली - तुमच्याकडे २ हजाराची नोट असल्यास सावध व्हा. दोन हजाराची नोट खरी आहे की खोटी ते तपासून घ्या. बोगस नोटांची आकडेवारी देत मोदी सरकारने हे आवाहन केले आहे. २०१८ ते २०२० या कालावधीत बोगस नोटांचे प्रमाण वाढले आहे. याबद्दलची आकडेवारी अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिली. एनसीआरबीकडे असलेल्या आकडेवारीनुसार २०१८ ते २०२० दरम्यान जप्त करण्यात आलेल्या बोगस नोटांची संख्या वाढली आहे.

अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत बनावट नोटांबद्दल महत्त्वाची माहिती दिली. २०१६ मध्ये २ हजारांच्या केवळ २ हजार २७२ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. २०१७ मध्ये हा आकडा थेट ७४ हजार ८९८ वर पोहोचला. २०१८ मध्ये हे प्रमाण कमी झाले आणि ५४ हजार ७७६ वर आले. २०१९ मध्ये २ हजाराच्या ९० हजार ५५६ नोटा जप्त करण्यात आल्या. २०२० मध्ये हेच प्रमाण थेट २ लाख ४४ हजार ८३४ वर गेले. २०२० नंतर २ हजाराच्या किती बोगस नोटा जप्त करण्यात आल्या याची माहिती मोदी सरकारने दिलेली नाही. बँंिकग यंत्रणेत जप्त करण्यात आलेल्या २ हजारांच्या बोगस नोटांची संख्या २०१८-१९ ते २०२०-२१ या कालावधीत कमी झाल्याचे सरकारने संसदेत सांगितले. २०२१-२२ मध्ये बँकिंग यंत्रणेत २ हजाराच्या १३ हजार ६०४ नोटा आढळल्या.

बोगस नोटांचा सुळसुळाट वाढला; आरबीआयचा अहवाल -
मे महिन्यात आरबीआयचा अहवाल आला. देशात बोगस नोटांचे प्रमाण वाढत असल्याची आकडेवारी आरबीआयने दिली. २०२१-२२ मध्ये बोगस नोटांचे प्रमाण वाढले आहे. ५०० रुपयांच्या बोगस नोटांचे प्रमाण तब्बल १०१.९ टक्क्यांनी वाढले आहे. तर २००० रुपयांच्या नोटांचे प्रमाण ५४.१६ टक्क्यांनी वाढले आहे, असे आरबीआयने अहवालातून सांगितले. ३१ मार्च २०२२ पर्यंत बाजारात असलेल्या ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांचे प्रमाण ८७.१ टक्के होते. यानंतर १० रुपयांच्या नोटेचा नंबर लागतो. बाजारात असलेल्या एकूण चलनांत १० रुपयांच्या नोटांचे प्रमाण २१.३ टक्के आहे.

Post a Comment

Previous Post Next Post