तुम्ही आकाशात असाल तर आम्ही तुम्हाला जमिनीवर आणू - किशोरी पेडणेकर

0


मुंबई - महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने 150 चा पहिला नारा दिला आहे. अमित शहा हे केंद्रीय नेते आहेत, त्यांचा दीडशेचा नारा आमची कॉपी आहे. शिवाय कोण कोणाला धमक्या देतंय याकडे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांना माहीत आहे. मुंबईकरांना तुमच्या धमक्या आणि खोके नको आहेत. शिवाय आम्ही सुरुवातीपासूनच जमिनीवर आहोत, आम्हाला जमीन दाखवा, तुम्ही आकाशात असाल तर आम्ही तुम्हाला जमिनीवर आणू, लवकरच भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर देताना दिला आहे.

राजकारणात सर्वकाही सहन करा पण धोका पत्करू नका. धोका निर्माण करणाऱ्यांना त्यानुसार शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईच्या राजकारणात भाजपचेच वर्चस्व असावे. आता उद्धव ठाकरेंना जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांच्या या टिप्पणीला शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनीही अमित शहांच्या या वक्तव्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबईकरांच्या रोजच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना कोण भेटतो हे महत्त्वाचे आहे. आमचे शाखाप्रमुख मुंबईतील लोकांना सर्वात आधी भेटतात. शिवसेनेला मुंबईकरांच्या समस्या कळतात. तुमचा हेतू आता सर्व राज्यांना आणि सर्व पक्षांना समजला आहे. सर्व पक्षांना संपवून स्वतःचे राज्य आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, मात्र जनतेला त्यांचे खरे रूप कळले आहे, असा हल्लाबोल पेडणेकर यांनी केला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)