मराठी पाट्याबाबत पालिकेचा आज अॅक्शन प्लॅन, दसऱ्यानंतर कारवाई

0

मुंबई  -  मुंबईत मराठी पाट्या नसणाऱ्या दुकाने, आस्थापनांवर दस-यानंतर म्हणजे गुरुवारपासून कारवाईचा बडगा उगारणार आहे. मंगळवारी याबाबतचा अॅक्शन प्लॅन तयार करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत सुमारे पाच लाख दुकाने, आस्थापना असून त्यापैकी ५० टक्केच दुकानांनी मराठी पाट्यांचा नियम अमलात आणला आहे. मात्र, आता उर्वरित सुमारे दोन ते अडीच लाख दुकानांवर गुरुवारपासून कारवाई करण्याची तयारी पालिकेने केली आहे.  यापूर्वी २०१८ च्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या दुकानांवर मराठी पाट्या बंधनकारक होते. पण, नव्या नियमानुसार कर्मचार्‍यांची संख्या विचारात न घेता मराठी भाषेतच फलक असणे बंधनकारक केले आहे.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२ तील कलम ३६ ‘क’ (१)च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनास कलम सातनुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे. मात्र, मुदत वाढ देऊनही अनेक दुकानांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पालिकेचे पथक मुंबईभर दुकानांची तपासणी करून नियमानुसार कारवाई करणार आहे. 

पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाच्या ७५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा चमू तयार केला आहे. मुंबई पालिकेच्या सर्व २४ विभागात  होणार्‍या कारवाईत दुकानांवर मराठी पाटी न आढळल्यास दंड आकारला जाईल. त्यावेळी, दंड न भरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पालिकेच्या संबंधित अधिका-य़ाने सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)