
मुंबई - शिवसेनेमध्ये फूट पडली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. खरी शिवसेना कोणाची यावरून वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. तर धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार यावरून निवडणूक आयोगाकडे वाद सुरू आहे. यावर आज निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवलं आहे. यासंदर्भातला अंतरिम आदेश निवडणूक आयोगानं शनिवारी रात्री जारी केला. अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक तसंच याप्रकरणी अंतिम आदेश येईपर्यंत हा आदेश कायम राहील. त्यामुळं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणत्याही गटाला शिवसेनेचं नाव किंवा निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही. या दोन्ही गटांना त्यांच्या पक्षाचं नवं नाव आणि निवडणूक चिन्हांचे प्राधान्यक्रम सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत द्यायचे आहेत. या नावात त्यांना शिवसेनेचं नाव वापरण्याची मुभा निवडणूक आयोगानं दिली आहे.