Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

अंधेरी पूर्व पोटनिवडणूकिसाठी ३१.७४ टक्के मतदान, ६ नोव्हेंबरला मतमोजणी


मुंबई - महाराष्ट्र विधानसभेच्या '१६६ - अंधेरी पूर्व' या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या या मतदान प्रक्रियेत सुमारे ३१.७४ टक्के मतदान झाले असून सर्व प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी आज दिली.

अंधेरी पूर्व या मतदारसंघातील सर्व २५६ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजतापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीस म्हणजे सकाळी ११ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदानाची टक्केवारी होती. दुपारी १ वाजेपर्यंत १६.८९ टक्के मतदान झाले. तर दुपारी ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के;  सायंकाळी ५ वाजेपर्यंत २८.७७ टक्के मतदान झाले. तर मतदान प्रक्रियेच्या अखेरीस अर्थात मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मतदारसंघात सुमारे ३१.७४ टक्के मतदान झाल्याची माहिती पाटील यांनी दिली.

२५६ मतदान केंद्रांपैकी मरोळ एज्युकेशन अकादमी हायस्कूल येथे मतदान केंद्र क्रमांक ५३ मध्ये सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. या मतदान केंद्रांमध्ये एकूण १,४१८ मतदारांमध्ये ७२६ महिला मतदार असल्याने आणि महिला मतदारांची ही संख्या अंधेरी पूर्व मतदारसंघात सर्वाधिक असल्याने या ठिकाणीच सखी मतदान केंद्र तयार करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

मतदानादरम्यान आवश्यक त्या सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या अंतर्गत प्रामुख्याने प्रत्येक मतदान केंद्रावर व्हील चेअर, वैद्यकीय किट, पिण्याच्या पाण्याची सुविधा आदी सोयी सुविधांचा समावेश होता. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे, शांततेत आणि सुरक्षिततेत पार पाडल्याबद्दल निवडणूक कार्यासाठी काम केलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

मतदान प्रक्रिया सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी योगेंद्र नानोसकर, अजय घोळवे, अरुण कटाले आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून, दत्तात्रय सातपुते यांनी विशेष मेहनत घेतली. तर या संपूर्ण प्रक्रियेसाठी साधारणपणे १ हजार ६०० अधिकारी, कर्मचारी, १ हजार १०० एवढ्या संख्येतील मुंबई पोलीस दल व इतर सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित होते. या व्यतिरिक्त ७० सूक्ष्म निरीक्षक देखील कर्तव्यावर होते.

आजच्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने मतमोजणी ही रविवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजता पासून सुरू होणार आहे, अशीही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom