बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्राच्या जागेसाठी पालिका रेडिरेकनर नुसार मोबदला

Anonymous
0

मुंबई - झोपडपट्टीमधील सर्वसामान्य आणि गोरगरीबांना घराजवळच उपचार मिळावेत यासाठी पालिकेने सुरू केलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्राला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ही केंद्रे झोपडपट्टी जवळपास उभारली जात असल्याने झोपडपट्टीवासीयांना आपली जागाही देता येणार आहे. पालिकेकडून या जागा विकत घेऊन रेडीरेकनरनुसार मोबदला दिला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून झोपडपट्टी परिसरात आरोग्य केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या केंद्रांना अल्पावधितच चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या ‘पोर्टा केबीन’ आरोग्य केंद्र उपक्रमात एक डॉक्टरसह दोन नर्स उपलब्ध राहणार आहेत. पहिल्या टप्प्यात ५२ आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मोफत व दिवसा व रात्रीही ही आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्याने नागरिकांना त्याचा फायदा होतो आहे. या महिन्यात २६ जानेवारीपर्यंत या आरोग्य केंद्रांची संख्या १०० करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. सकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत ही आरोग्य केंद्रे सुरू राहणार आहेत. त्यामुळे रात्री कामावरून घरी येणार्‍यांसाठीही या उपक्रमाचा फायदा होणार असल्याचे डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

१४७ प्रकारच्या चाचण्या मोफत -
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात १४७ प्रकारच्या चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. मात्र या आरोग्य केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी पालिकेकडे सध्या जागा नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे जर झोपडपट्टी भागातील आपले तयार बांधकाम विकायचे असल्यास पालिका मोबदला घेऊन ते घेणार आहे. सध्या झोपडपट्टयात ही केंद्रे सुरु करण्यावर भर दिला आहे. २५ ते ३० हजारांच्या लोकसंख्येसाठी एक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येणार आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)