Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चालक-वाहकांसाठी मुंबई सेंट्रल येथे वातानुकूलित विश्रांती गृह


मुंबई - दिवसभर दमून-भागून आलेल्या कष्टकरी चालक वाहकांना चांगली झोप लागावी, यासाठी वातानुकूलित विश्रांती गृह बांधून देण्याचे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री आणि मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. ते जिल्हा नियोजन मंडळाच्या ३ टक्के निधीतून बांधण्यात आलेल्या पहिल्या हिरकणी कक्षाचे उद्घाटन मुंबई सेंट्रल बसस्थानकावर करताना बोलत होते. (Air-conditioned rest house at Mumbai Central for driver-carriers)

त्यांनी याप्रसंगी मुंबई सेंट्रल येथील सध्याच्या चालक - वाहक विश्रांतीगृहाला भेट दिली व एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव नीवतकर व एसटीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

ते पुढे म्हणाले की, मी कोकणातील आहे. एसटी आणि कोकणी माणसाचे ऋणानुबंध खूप जुने आहेत. गणपती व होळी सारख्या सणाबरोबरच मुंबईच्या चाकरमान्यांना उन्हाळी सुट्टीसाठी ,आंगणेवाडीच्या यात्रेसाठी सुखरूप घेऊन जाण्याचं काम,गेली कित्येक वर्ष एसटी इमानेइतबारे  करत आली आहे. यावेळी त्यांनी सावंतवाडी- मुंबई या पहिल्या रातराणी बसची आठवण आवर्जून सांगितली. 

अमृत महोत्सवी ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या एसटी बसेस मधून मोफत प्रवास व महिलांना ५० टक्के प्रवासी भाड्यात सवलत या शासनाने घेतलेल्या दोन क्रांतिकारी निर्णयामुळे एसटीला पुन्हा "अच्छे दिन" आले आहेत, हे पाहून शासनाचा एक घटक म्हणून मला अभिमान वाटतो! असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले. 

मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने जिल्हा नियोजन विकास निधीतून मुंबई सेंट्रल बसस्थानक येथील महिला व पुरुष विश्रांती गृह वातानुकूलित सुविधेसह अत्याधुनिक करून देण्याचे निर्देश कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मुंबई शहर जिल्हाधिकारी यांना दिले. भविष्यात प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयी -सुविधानी सुसज्ज अशी विश्रांती गृहे जिल्हा नियोजन व विकास योजनेतून व्हावीत यासाठी हा प्रकल्प पथदर्शी ठरेल, असा आशावाद याप्रसंगी मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom