
मुंबई - मुंबईच्या मालाड मार्वे समुद्रकिना-यावर फिरण्यासाठी आलेल्या बारा ते पंधरा वर्षे वयोगटातील पाच मुले समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुडालेल्या पाच मुलांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले असून तीन मुले अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. (5 children drowned at Malad beach in Mumbai)
मिळालेल्या माहितीनुसार, मालवणी परिसरातील ही पाच मुले मालाड मारवे समुद्रकिना-यावर फिरण्यासाठी गेली असता यांनी आंघोळ करण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ही पाचही मुले बुडू लागली. समुद्रकिना-यापासून साधारणपणे अर्धा किलोमीटर आत खोल समुद्रात ही मुले बुडाली. मुले बुडत असल्याची माहिती तेथे उपस्थित पर्यटकांना मिळताच पाचही मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यावेळी कृष्णा जितेंद्र हरिजन (१६ वर्षे ) आणि अंकुश भारत शिवरे (१३ वर्षे ) या दोन मुलांना वाचवण्यात यश आले असून शुभम राजकुमार जयस्वाल (१२ वर्षे), निखिल साजिद कायमकूर (१३ वर्षे), अजय जितेंद्र हरिजन (१२ वर्षे) ही तीन मुले बेपत्ता असून कोस्टगार्डचे जवान, अग्निशमन दलाचे जवान, महापालिकेचे जीव रक्षक आणि कोस्टगार्डचे जवान समुद्रात बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेत आहेत.