Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन ठरली देशपातळीवरील सुवर्ण पदकाची मानकरी


मुंबई - मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईनच्या माध्यमातून मुंबईकरांना कचऱ्याशी संबंधित तक्रारींचे निवारणाची आधुनिक सुविधा दिल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेला सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले आहे. ईटी गव्हर्मेंट डिजिटेक कॉन्क्लेव्ह एण्ड अवॉर्ड २०२३ या गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या परिषदेत हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरी सेवा देतानाच माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेला या सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले आहे. या कामगिरीबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी माहिती तंत्रज्ञान विभागाचे कौतुक केले आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्त्यांवर तसेच अंतर्गत भागातही कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी सहज, सोपी व जलद यंत्रणा विकसित करावी, अशा सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्पलाईनच्या निर्मितीला सुरूवात झाली. नागरी तक्रारी निवारणासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड घेऊन नागरिकांच्या सुविधांमध्ये भर घालण्याच्या अनुषंगाने हेल्पलाईन विकसित करण्यासाठी उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव तसेच संचालक (माहिती तंत्रज्ञान) शरद उघडे यांच्यासह संपूर्ण टीमने अथक प्रयत्न केले. माहिती तंत्रज्ञान विभागाने गत वर्षभरात मुंबईकरांच्या सेवेत तंत्रज्ञानावर आधारीत विविध नागरी सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाइन विशेष उल्लेखनीय ठरली आहे.

मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईनच्या माध्यमातून एक अद्ययावत अशी तक्रार निवारण यंत्रणा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने विकसित केली आहे. सोबत एक डॅशबोर्ड विकसित करण्यात आला आहे. सोप्या आणि सहजपणे तक्रार दाखल करण्याची ही पद्धत आहे. यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांना घनकचरा संबंधित तक्रारी दाखल करणे शक्य आहे. हेल्पलाईनच्या माध्यमातून वेळीच तक्रारीची दखल घेतली गेल्याने तसेच तक्रारीचे तत्काळ निवारण झाल्याने हेल्पलाईनला नागरिकांनी पसंती दिली आहे. एक गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक सेवा देणारी हेल्पलाईन अशी ख्याती या सेवेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या हेल्पलाईनला देशपातळीवरील पुरस्कार मिळाल्याने त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

या सोबतच, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या मदतीने नाल्यांमधून गाळ काढण्याच्या तक्रारींवर अतिशय गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी संघटितपणे काम केले. परिणामी, माहिती तंत्रज्ञानावर आधारित गुणवत्तापूर्ण हेल्पलाईन नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देणे शक्य झाले. महत्वाचे म्हणजे नागरिकांना हे तंत्रज्ञान सोयीस्कररीत्या कशा प्रकारे हाताळता आणि वापरता येईल, या अनुषंगाने संपूर्ण टीमने परिश्रम घेतले. म्हणून माहिती तंत्रज्ञानावर आधारित सेवा उपलब्ध करून देत हा मैलाचा दगड गाठणे महानगरपालिकेला शक्य झाले आहे.

घनकचरा व नाल्यांमधून गाळ काढणे या दोन्ही हेल्पलाईन नागरी सुविधेसाठी व्हॉटद्वसॲपचा वापर करण्यात आला. ही यंत्रणा सॅप हाना आणि एआरसी जीआयएस यंत्रणेशी संलग्न आहे. महत्वाचे म्हणजे यंत्रणेत वापरण्यात आलेले शक्तिशाली टूल्स हे यंत्रणा सुरळीतपणे कार्यरत राहण्यासाठी मदतीचे ठरले आहेत. तसेच २४x७ उपलब्ध आणि परिणामकारक अशी सेवा देणे शक्य झाले. 

शासकीय यंत्रणेत तंत्रज्ञानाची सुविधा देणाऱ्यांचा गौरव करणारे पुरस्कार म्हणून ईटी गव्हर्नमेंट डिजिटेक अवॉर्डची ख्याती आहे. यंदाच्या पुरस्कारांसाठी देशभरातून ३७० संस्थांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये निवडण्यात आलेल्या १६० स्पर्धकांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपले स्थान निश्चित केले होते. तंत्रज्ञानाची अंमलबजावणी, नावीण्यपूर्णता तसेच नागरी सेवांमध्ये सुधार होतानाच नागरिकांचा सहभाग यासारख्या निकषांवर आधारित अंतिम मोजक्या स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. 

या निवडक स्पर्धकांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुवर्ण पदक मिळवण्यात यश मिळवले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने माहिती तंत्रज्ञान खात्याचे सहायक अभियंता डेनिस फर्नांडिस यांनी हा पुरस्कार स्वीकारला. बृहन्मुंबई महानगरपालिकेने डिजिटल सुधारणांसह नागरी सुविधांकरिता अद्ययावत सेवा देण्यासाठी निर्माण केलेल्या यंत्रणेची दखल घेतल्याबद्दल ईटी गव्हर्नमेंट डिजिटेक अवॉर्डचे महानगरपालिका प्रशासनाने आभार मानले आहेत. अशा पुरस्कारांमुळेच महानगरपालिकेला आगामी कालावधीतही कार्यक्षम, तंत्रज्ञानावर आधारीत सेवा आणि मुंबईकरांसाठी अधिक सुलभ सेवा देता येतील, असाही विश्वास बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom