8 August 2012 News - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 August 2012

8 August 2012 News


मुंबईत स्वाइन फ्लूचा दुसरा बळी
मुंबई - स्वाइन फ्लूने आज मुंबईत दुसरा बळी घेतला. ७२ वर्षीय पार्वती पिकले यांचा सोमवारी रात्री कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. २७ जुलैपासून त्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल होत्या. स्वाइन फ्लूच्या या मृत्यूची माहिती साथ रोग नियंत्रण कक्षाने लपवून ठेवली आहे. 
    मालाड चिंचोली बंदर मार्गावर सांगता हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणार्‍या पार्वती यांना मधुमेहामुळे किडनीचा विकार जडला होता. मालाडच्या एव्हरशाइन नर्सिंग होममध्ये डॉ. वरुण चावला यांच्याकडे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांच्यात स्वाइन फ्लूची लक्षणे दिसल्याने त्यांचे नमुने चाचणीसाठी एसआरएल प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. २७ जुलै रोजी चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पार्वती यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने कस्तुरबा रुग्णालयात हलवले होते. 
    सोमवारी रात्री कस्तुरबा रुग्णालयात पार्वती यांचा मृत्यू झाला, परंतु या मृत्यूची माहिती साथ रोग नियंत्रण कक्षाने जाहीर केलेली नाही. यापूर्वीही पहिल्या बळीची माहिती कक्षाने लपवून ठेवली होती. त्याबद्दल कस्तुरबाचे अधीक्षक डॉ. उमेश आयगल यांना पालिकेने कारणे दाखवा नोटीसही बजावली असल्याचे समजते.
    साथ रोग नियंत्रण कक्षाने आज दिलेल्या माहितीनुसार मुंबईत स्वाइन फ्लूचे आणखी चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यात जोगेश्‍वरीतील ३२ वर्षीय इसम, वांद्य्रातील ७५ वर्षीय महिला आणि मालाडमधील ४५ वर्षे वयाच्या दोन इसमांचा समावेश आहे. चौघांनाही टॅमिफ्लू उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कक्षाच्या प्रमुख डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

दहीहंडीसाठी पाण्याचा जपून वापर करा
मुंबई - पावसाने दगा दिल्यामुळे यंदा पाण्याचा काळजीपूर्वक वापर करणे आवश्‍यक आहे. म्हणूनच दहीहंडीच्या दिवशी (ता. 10) पाण्याची उधळपट्टी करू नका; पाण्याचा जपून वापर करा, असे आवाहन महापालिकेने मुंबईकरांना केले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात यंदा पावसाचे प्रमाण सरासरी 77 टक्के असून गेल्या वर्षीच्या तुलनेत जलसाठा 75 टक्के आहे. त्यामुळे सध्याचा जलसाठा वर्षभर पुरवण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. केंद्र आणि राज्य सरकारनेही जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काटकसरीच्या उपायोजनेचा एक भाग म्हणून दहीहंडी सणाच्या दिवशी पाणी जपून वापरा, असे आवाहन महापालिकेने मुंबईकरांना केले आहे.

बेस्ट दिनानिमित्त ‘ई-पर्स’ कॅशलेस योजनेची सुरुवात मंगळवारी वडाळा आगारातून बेस्ट समिती अध्यक्ष अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेमुळे प्रवाशांना आता सुट्टे पैसे जवळ ठेवण्याची गरज लागणार नसल्याने प्रवाशी व बस कर्मचाऱ्यांमध्ये भांडण होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी जीवनराव गोरे 
एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी धाराशीव येथील जीवनराव गोरे यांची निवड झाली आहे. गेली १२ वर्षे या पदावर असलेल्या सुधाकर पारिचारक यांनी अखेर या पदाचा राजीनामा दिला आहे.
जीवनराव गोरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातलग असल्याचे समजते. धाराशीव जिल्हा परिषद तसेच विविध संस्थांमध्ये काम करण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. राज्यातील गोरगरीब जनता प्रवासासाठी आजही एसटीवर अवलंबून आहे. गोरे यांच्या कालावधीत एसटीच्या प्रवासी सेवेत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS