शिष्टमंडळाला सरकारने भेट नाकारली
मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश २0१३ विरोधात काढलेल्या मोर्चाचा फज्जा उडाला. मंगळवारी आझाद मैदानावर काढलेल्या महामोर्चा मध्ये हजारो लोक येतील असा दावा केला असताना काही तुरळक उपस्थिती होती. एकीकडे वारकऱ्यांचे नाव पुढे करत बुवाबाजी करणाऱ्या संघटनांच्या मोर्चाला कोणीही जाऊ नये असे आवाहन वारकऱ्यांच्या संघटनांनी केले होते. तर सरकारने महामोर्चातील वारकर्यांच्या शिष्टमंडळाची भेट नाकारली. यामुळे महामोर्चा काढणाऱ्यांना जबरदस्त हादरा बसला आहे.
पंतप्रधान मुंबई दौर्यावर असल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट होणार नव्हती. त्यामुळे वारकर्यांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेण्याचे ठरवले; पण शिष्टमंडळ मंत्रालयात जाऊनही गृहमंत्र्यांची भेट न झाल्याने शिष्टमंडळाला हात हलवत परत यावे लागले आहे. एकीकडे महामोर्चाला मिळालेला थंड प्रतिसाद आणि सरकारने भेट नाकारल्याने संतप्त झालेल्या भोंदू वारकर्यांनी सरकारचा निषेध करत आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत 'वचपा ज्योत' विझू देणार नसल्याचा इशारा भारतीय संस्कृती रक्षक समितीचे कार्याध्यक्ष रामेश्वर शास्त्री यांनी या वेळी दिला आहे.
मंगळवारी मुंबईत निघणार्या मोर्चावर बहिष्कार घालण्याचा निर्धार पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत दिंडीकरी फडकरी समाज संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जळगावकर, माजी अध्यक्ष माधव शिवणीकर, देहूकर फडाचे प्रमुख आणि तुकाराम महाराजांचे वंशज बापूसाहेब देहूकर, वासकर फडाचे प्रमुख नवृत्त न्यायाधीश विठ्ठल वासकर, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख भानुदास ढवळीकर, अखिल विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष अरुण बुरघाटे, ठाकूर फडाचे प्रमुख गोपाळ ठाकूर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील आदी प्रमुख संत मंडळी या बैठकीला हजर होती. वारकर्यांचे नाव पुढे करत बुवाबाजी करणार्यांनी काढलेल्या मोर्चाच्या विरोधात वारकर्यांच्या सर्व प्रमुख संघटनांची एकजूट झाली असून काही भोंदू बाबांनी प्रायोजित केलेल्या या मोर्चापासून सर्व वारकर्यांनी दूर राहावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले होते.
यामुळे मोर्चाला वारकरी लोकांनी येण्याचे टाळले होते. मोर्चाला लोकांची उपस्थिती दिसावी म्हणून लोकांना पैसे देवून गाड्यांची व्यवस्था करून लोकांना जेवण देण्याचे आश्वासन देवून आझाद मैदान मधील मोर्चाला आणल्याचे काही उपस्थित लोकांनी सांगितले. पैसे खर्च करूनही लोक आली नाहीत मोर्चाचा सुद्धा फज्जा उडाला आणि सरकारने भेट नाकारल्याने अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा विरोध करणाऱ्यांची गोची झाली आहे.


No comments:
Post a Comment