मुंबई - 27 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई : पश्चिम उपनगरातील सरकारी जमिनी व नदी-नाल्यात भराव टाकून त्यावर अनधिकृत बांधकाम करणार्यांवर कठोर कारवाई करावी तसेच म्हाडाच्या खुल्या जागेवर व्यावसायिक अवैध गाळे निर्माण करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालिका आयुक्त सीताराम कुंटे याना भेटून आयुष अँकॅडमीचे अध्यक्ष रघुनाथ कोठारी यांनी केली.
मालाड (पूर्व) पी-उत्तर विभागातील म्हाडाचे मोकळे भूखंड व आदिवासी जमिनींवर व्यावसायिक गाळे बनवून पालिका तसेच सरकारचे नुकसान केले जात असल्याची तक्रार कोठारी यांनी २९ जानेवारी २0१३ रोजी पालिका आयुक्त कुंटे यांच्याकडे केली होती. त्यांनी संबंधित विभागाला सूचना देऊन कारवाई करावी, असे आदेश दिले होते, मात्र उलट जैन नावाचे सहाय्यक पालिका उपायुक्तांनी माझ्या नावाची आयुक्तांना तक्रार करता काय? असा उलट प्रश्न कोठारी यांना विचारला. कोठारी यांनी वारंवार पाठपुरावा केला, मात्र त्यांना जैन यांनी जुमानले नाही. अखेर कोठारी यांनी राष्ट्रवादीचे युवक कांदिवली (पूर्व) तालुकाध्यक्ष रवी दांडगे यांच्यासहित आयुक्त कुंटे यांची भेट घेऊन पुन्हा आयुक्तांना हा अनधिकृत बांधकाम प्रश्न अवगत करून दिला. आयुक्तांनी प्रत्येक वॉर्डात अवैध बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष अधिकारी नियुक्त केल्याचे सांगितले. या अधिकार्यास अवैध बांधकामे निष्कासित करण्याचे पूर्ण अधिकार आहेत, असे सांगितले. जर हा अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करत असेल तर त्याच्यावर देखील स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल होऊन अधिकार्यास शिक्षा होऊ शकते, असे सांगितले. दरम्यान, दांडगे यांनी दामू नगर ओटीस कंपनी समोर ओढय़ात भराव टाकून अवैध गाळे बनविले आहेत, त्यावर कारवाई करावी, काही पक्ष हे गाळे वाचवून परप्रांतीयांना विकत आहेत, त्यामुळे पालिकेचे नुकसान होत आहे, असे सांगितले. त्या वेळी आयुक्त कुंटे यांनी हा प्रश्न विशेष अधिकार्याकडे देऊन त्याच्यावर कारवाई होईल, असे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले.


No comments:
Post a Comment