26/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई – मुंबई पालिकेच्या वतीने २००९ मध्ये कामगार भरतीसाठी मागवण्यात आलेल्या पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा यादी प्रशासनाने बाद केली आहे. महापालिकेने प्रत्यक्षात ३,९१६ जागांसाठी अर्ज मागवले होते. परंतु प्रत्यक्षात चक्क ५,४८३ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली.
मुंबई महापालिकेतील वेगवेगळ्या खात्यांमध्ये कामगार आणि आया या संवर्गातील पदे भरण्यासंदर्भात ३,९१६ जागांसाठी ६ नोव्हेंबर २००९ रोजी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने २ लाख ८९ हजार २४८ अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये या सर्व अर्जाची प्राथमिक छाननी केल्यानंतर २ लाख ०८ हजार ५६५ अर्ज पात्र ठरले.
महापालिकेने त्यानंतर घेतलेल्या परीक्षेत उमेदवार १०० पैकी ९९ ते ९० असे गुण मिळवून उत्तीर्ण झाले होते. परंतु यांपैकी महापालिकेच्या विविध खाते, विभाग आणि रुग्णालयांमध्ये ३,९१६ कामगारांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर रुग्णालये आणि आरोग्य खाते यामधील कामगार, कक्ष परिचर आणि आया या रिक्त पदांमधील आवश्यकता लक्षात घेऊन ८१५ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ७५२ उमेदवारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. अशाप्रकारे एकूण ५,४८३ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली असून, उर्वरित उमेदवारांची गुणवत्ता यादी महापालिका प्रशासनाने जुलै महिन्यातच रद्द केली. त्यामुळे महापालिकेच्या सेवेची स्वप्ने पाहणा-या प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांचे स्वप्न भंग पावले आहे.


No comments:
Post a Comment