डेहराडून एक्स्प्रेस आगीच्या चौकशीचे आदेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 January 2014

डेहराडून एक्स्प्रेस आगीच्या चौकशीचे आदेश

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत
9/1/2014
मुंबई : पश्‍चिम रेल्वे मार्गावर धावणार्‍या वांद्रे टर्मिनस ते डेहराडून एक्स्प्रेसला मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत ९ प्रवाशांचा मृत्यू झाला. या आगीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई-सुरत सेक्शनमध्ये डेहराडून एक्स्प्रेसला आग लागली. या आगीची माहिती गँगमनने घोलवड रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तरांना दिली. त्यानंतर अपघात मेडिकल रिलीफ व्हॅन मुंबई आणि वलसाडहून घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. या आगीत जळालेले ६ डबे एक्स्प्रेसपासून दूर केल्यानंतर सकाळी ५ वाजून ३0 मिनिटांनी एक्स्प्रेस डेहराडूनसाठी रवाना करण्यात आली. तसेच सकाळी ६ वाजून ४0 मिनिटांच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. तसेच रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. वलसाड येथे डेहराडून एक्स्प्रेसला ५ जादा कोच जोडण्यात आले. प्रवाशांच्या सोयीसाठी ५00 फूड पॅकेट, चहा आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. त्यानंतर गाडी पुढे रवाना करण्यात आली. गेल्या काही दिवसांपूर्वीच बंगळुरू-नांदेड गाडीच्या एसी डब्याला आग लागली होती. त्या अपघातामध्ये २६ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तसेच तीन दिवसांपूर्वी ठाण्यात यार्डमध्ये उभ्या असलेल्या लोकलच्या एका मोटरकोच डब्याला आग लागली होती. या दोन्ही दुर्घटनांपाठोपाठ आता पुन्हा एकदा एक्स्प्रेस गाडीला आग लागल्याने रेल्वेच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

रेल्वेचे आऊटसोर्सिंग केल्यामुळेच असे अपघात - रेल्वे संघटना
भारतीय रेल्वेमध्ये सुमारे २ लाख पदे रिक्त आहेत. त्यामध्ये सुरक्षा विभागातही हजारो पदे रिक्त आहेत. ही पदे न भरता या कामांसाठी रेल्वे प्रशासनाने आऊटसोर्सिंग केले आहे. ज्या कंत्राटदाराकडे गाडीची सुरक्षा तपासण्याचे काम दिलेले आहे त्यांच्याकडे कुशल कामगार नसल्यामुळे ते गाडीची देखभाल आणि दुरुस्ती योग्य करीत नाहीत, त्यामुळे अशा प्रकारचे अपघात घडतात.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS