मुंबई : मराठी माणूस आणि त्याच्या अस्तित्वाच्या प्रश्नाचा मक्ता घेतल्याचा अविर्भाव आणणा-या शिवसेनेला शिव वडापावचा विसर पडला आहे. शिववडापाव योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली नाही मात्र “नाईटलाईफ ”ही नवी योजना मुंबईकरांच्या माथी मारण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे जो आक्रमक पणा शिवेसना- भाजप नाईट लाईफसाठी दाखवत आहे तोच आक्रमकपणा त्यांनी शिववडापाव धारकांना व मराठी माणसांना न्याय देण्यासाठी वापरावा अशी भूमिका कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी घेतली. तसे निवेदन त्यांनी बुधवारी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकरयांना दिले.
शिवसेनेनं सुमारे 5 वर्षांपूर्वी तमाम मराठी बेरोजगारांना रोजगार देण्याच्या उद्देशानं शिववडापाव ही योजना आणली. शिववडापाव योजनेंतर्गत अनेक मराठी कुटूंबियांनी मुंबईच्या कानाकोप-यात शिववडापावचे स्टॉल सुरू केले. त्यासाठी संबंधित स्टॉल धारकाकडून आवश्यक कागदपत्रही बनवून घेण्यात आली. मात्र आजही शिववडापाव स्टॉल साठी अधिकृत नियम , कायदे बनवले गेलेले नाहीत. त्यामुळे तमाम शिववडापाव धारक आणिया स्टॉलवरील कामगारांवर अनिश्चिततेचे सावट आहे. उच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार, फुटपाथवर कुठल्याही प्रकारचे खाद्य पदार्थ तळणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे शिवसेना या स्टॉल्सना कसे आणि कुठल्या प्रकारचे संरक्षण देतआहे? या स्टॉल्सना आणि शिववडापाव धारकांना अधिकृत कसे करणार हा प्रश्न उग्र आहे.
आज मुंबई महानगरपालिका ,राज्य आणि केंद्र सरकारमध्येही शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे जर शिवसेनेनं ठरवलं तर ज्या शिववडापाव धारकांवर बेरोजगारी आणि अनिश्चिततेचं भय आहे ते दूर होईल अशी भूमिका राणे यांनी घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेची नाईट लाईफ योजना अभिनंदनीय आहे. मात्र शिववडा पाव धारकांना आणि मराठी माणसाला शिवसेनेनं न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ही राणे यांनी केलीय.
