मुंबई - राज्यातील पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत व कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी कॉ. उमा पानसरे यांच्यावर कोल्हापुरात झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात मुंबई आणि परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
पुरोगामी व डाव्या संघटनांच्या प्रतिनिधींनी मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको करून या हल्ल्याविरोधात आपला निषेध व्यक्त केला. यात मुंबई, ठाणे परिसरातील विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी सामील झाले होते.
या रास्ता रोकोमुळे तब्बल अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. रास्ता रोको करणा-या कार्यकर्त्यांना आझाद मैदान पोलिसांनी अटक करून सायंकाळी उशिरा त्यांची सुटका करण्यात आली.
दरम्यान, ओबीसी सेवा संघ, फुले-आंबेडकरी संघटनांकडून सायंकाळी हुतात्मा चौकातून एक रॅली काढून पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. दादर पूर्वेलाही विविध संघटनांतर्फे काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करण्यात आला.
आझाद मैदानात दुपारी कॉ. पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यानंतर हा झालेला हल्ला एकाच मानसिकतेतून आणि व्यवस्थेतून झाला असून यासाठी सरकारी यंत्रणा आणि पोलिसांची उदासीन मानसिकता जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला.
या दोन्हीही हल्ल्यांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असून केवळ पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांवरच अशा प्रकारचे प्राणघातक हल्ले का होतात, असा सवालही या वेळी करण्यात आला. राज्यात होत असलेल्या पुरोगामी विचारवंत आणि कार्यकर्त्यांवरील हल्ले हे चिंताजनक असून याविषयी महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकार आता तरी जागे होईल काय, असा सवाल या वेळी विविध प्रतिनिधींकडून उपस्थित करण्यात आला.
या रास्ता रोको आणि धरणे आंदोलनात प्रामुख्याने पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व पत्रकार मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यात कॉ. प्रकाश रेड्डी, आमदार कपिल पाटील, बँक कर्मचारी युनियनचे नेते कॉ. विश्वास उटगी, कॉ. सुकुमार दामले, सुबोध मोरे, अमित नाईक, डाव्या पक्षाचे कॉ. सुधीर ढवळे, मिलिंद रानडे, जनता दलाचे प्रभाकर नारकर, दिग्दर्शक आनंद पटवर्धन, नाटककार जयंत पवार, दत्ता इस्वलकर, महेंद्र सिंह, मोलकरीण संघटनेच्या बबली रावत आदींचा समावेश होता.
