मुंबई- आरे कॉलनीमधील झाडे मुंबई मेट्रो-३ प्रकल्पाच्या प्रस्तावित कारशेडसाठी कापण्यात येणार असल्याने यावरून राजकीय धूळवड खेळली जात असतानाच आता यात राष्ट्रवादी काँग्रेसने उडी मारली आहे. झाडे कापून विकास प्रकल्प राबवले जात असतील तर असे प्रकल्प नकोच, अशी भूमिका आरेच्या प्रकरणात शिवसेनेने घेतली.
या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिका गटनेते धनंजय (दादा) पिसाळ यांनी घेतला आहे. गेल्या तीन वर्षात विविध विकास प्रकल्पांसाठी तब्बल १६ हजारांहून अधिक झाडांची कत्तल झाली. ही झाडे तोडताना शिवसेनेचे युवराज कुठे होते.पुनर्रोपणाच्या नावाखालीच ११ हजार झाडांची कत्तल करण्यात आली. याला जबाबदार कोण? मारेक-यांवर सत्ताधारी शिवसेना कारवाई करणार का, असा खडा सवाल पिसाळ यांनी केला.
मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांसह विविध नागरी पायाभूत प्रकल्प, सुविधा प्रकल्पांच्या कामांसाठी झाडे कापण्यास वृक्ष प्राधिकरणामार्फत परवानगी दिली जाते. तीन वर्षात विकास प्रकल्पांच्या ठिकाणी ३३ हजार २०९ झाडांपैकी ५ हजार ३३९ झाडे कापली गेली. तर ११ हजार ४७१ झाडांच्या पुनर्रोपण करण्यास परवानगी दिली होती.
परंतु पुनरेपण करण्यात येणा-या झाडांचे आयुष्य कमी असते. त्यामुळे कापण्यात आलेली पाच हजार झाडे आणि पुनरेपित करण्यात आलेली ११ हजार झाडे अशाप्रकारे सुमारे १६ हजारांहून अधिक झाडे ही नष्ट झाली आहेत.
पुनरेपित करण्यात आलेली झाडे जर कुठे पुनरेपित केली असतील याची माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिका गटनेते धनंजय पिसाळ यांनी केली आहे. आरे कॉलनीतील झाडांची कत्तल करण्यास आपला विरोध आहे.
ते शहरातील एकमेव नैसर्गिक वन असून ती आपल्यासाठी देणगी आहे. तेथील झाडे कापली जाऊ नयेत या मताचे आपण आहोत. परंतु विकास प्रकल्पासाठी झाडांची कत्तल नको, असे जर शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे सांगत असतील तर तीन वर्षात १६ हजार झाडांची कत्तल कोणासाठी केली, असा सवाल त्यांनी केला आहे.
ही झाडे कोणाच्या फायद्यासाठी कापली गेलीत. ही झाडे कापण्यास आणणाऱ्या संबंधित अधिका-यांची चौकशी प्रशासन आणि शिवसेना करणार आहे का, असाही सवाल त्यांनी केला. झाडे कापण्याचे प्रमाण अधिक दिसू नये म्हणून पुनरेपित दाखवले जाते. परंतु पुनरेपित झाडे ही कधीच जगली जात नाहीत.
त्यामुळे यामध्ये विकासक आणि अधिकारी यांचेही साठेलोठे असल्याचा आरोप पिसाळ यांनी केला आहे. याबाबत आपण महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना निवेदन देऊन पुनरेपित करण्यात आलेल्या झाडांची माहिती आपल्याला मिळावी, अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
