मुंबई, दि. 18 : राज्यातून पोलिओचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी शासनाच्या सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करुन राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान यशस्वी करावे, अशी सूचना अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. विजय सतबीर सिंह यांनी केली.
राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान राज्यात 29 जानेवारी व 2 एप्रिल 2017 रोजी राबविण्यात येणार आहे. यासंदर्भातील आढावा बैठक आज आरोग्य विभागात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सिंह बोलत होते. या बैठकीस अभियानाचे संचालक डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य सेवा विभागाचे डॉ. सतीश पवार, अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्यासह मध्य रेल्वे, कोकण रेल्वे, जागतिक आरोग्य संघटना, मुंबई महानगरपालिका,इंडियन मेडिकल असोसिएशन, वैद्यकीय शिक्षण, युनिसेफचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत अभियानासंदर्भातील योजना, सूचना, समस्या याबाबत चर्चा करण्यात आली.
सिंह पुढे म्हणाले की, राज्य शासनाने ही मोहिम आजतागायत यशस्वीरित्या राबवली आहे. पोलिओ तीन प्रकारच्या विषाणूमुळे होतो. त्यापैकी टाईप २ या विषाणूमुळे होणारा पोलिओ नष्ट करण्यात राज्य शासन यशस्वी ठरले आहे. टाईप १ व ३ संदर्भात ५ वर्षाखालील मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवण्यासाठी ‘बायवॅलन्ट ओरल पोलिओ वॅक्सिन’ देण्यात येते. हे वॅक्सिन राज्यातील प्रत्येक बालकास मिळावे यासाठी संबंधित सर्व विभागांनी प्रयत्न करावेत आणि हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन सिंह यांनी संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना केले.
अभियान राबविण्यासंदर्भात जिल्हा, तालुका स्तरावर केल्या जाणा-या उपाययोजना व येणा-या अडचणींची माहिती श्री. सिंह यांनी यावेळी घेतली. तसेच यापुढे यासंदर्भात अडचण आल्यास आरोग्य सेवा विभागाच्या संबंधित अधिका-यांना संपर्क साधावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.