मुलुंड गव्हाणपाड्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामाकडे जिल्हाधिकारी आणि महापालिकेचे दुर्लक्ष - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 January 2017

मुलुंड गव्हाणपाड्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामाकडे जिल्हाधिकारी आणि महापालिकेचे दुर्लक्ष

मुंबई / अजेयकुमार जाधव / 20 Jan 2017 - 
मुलुंड गवाणपाडा येथील अग्निशमन केंद्रा समोरील महसूल विभागाच्या मैदान म्हणून आरक्षित असलेल्या भूखंडावर नगरसेवक, आमदार यांनी आपल्या फंडामधून अनधिकृत बांधकाम केले आहे. बांधकामाला दिलेल्या परवानगीपेक्षा मोठ्या क्षेत्रफळाची बांधकामे करण्यात आली आहेत. माहिती अधिकारातून सदर प्रकार उघडकीस आला असून याबाबत जिल्हाधिकारी आणि मुंबई महानगरपालिकेकडे या अनधिकृत बांधकामांची तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या कविता शिर्के यांनी केला आहे.

मुलुंडच्या गवाणपाडा अग्निशमन केंद्रा समोर महसूल विभागाची ८ एकर ७ गुंठे जागा (न.भू.क्र. १३२० क मौजे मुलुंड) मुंबई महानगरपालिकेद्वारे मनोरंजनाचे मैदान म्हणून आरक्षित करण्यात आली आहे. या भूखंडावर बांधकामासाठी पालिकेची परवानगी घेणे या अटीवर २००८ साली माजी नगरसेविका ज्योती महेंद्र वैती यांनी रजनीगंधा फाऊंडेशनला बालवाडी बांधून दिली आहे. २०१० साली चरण सिंह सप्रा यांनी वाचनालय, आमदार सरदार तारसिंह यांनी समाजकल्याण केंद्र, तर सध्याचे कॅबिनेट मंत्री रामदास कदम यांनी २०११ साली पाणपोई बांधली आहे.

हि सर्व बांधकामे ३०० चौरस फुटांपर्यंत करण्यासाठी जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. तसेच मुंबई महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक असताना राजकीय नेत्यांच्या बांधकामासाठी अश्या परवानग्या ना घेता कार्यकारी अभियंता, झोपडपट्टी सुधार मंडळ यांनी ३०० चौरस फुटापेक्षा मोठ्या क्षेत्रफळाची बांधकामे केली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आणि मुंबई महानगर पालिका यांच्याकडे लेखी तक्रार केल्यावर या भूखंडावरील काही बांधकामे तोडण्यात आली असली तरी राजकीय पुढाऱ्यांची मात्र बांधकामे तोडण्यात आलेली नसल्याने या अनधिकृत बांधकामांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या कविता शिर्के यांनी केली आहे.

Post Bottom Ad