मुलुंड ते घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात गर्दीच्या वेळेत वाहतूक नियोजनाचे आयुक्तांचे निर्देश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 August 2026

मुलुंड ते घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात गर्दीच्या वेळेत वाहतूक नियोजनाचे आयुक्तांचे निर्देश


मुंबई | JPN NEWS : पूर्व उपनगरातील रेल्वे स्थानक परिसरात गर्दीच्या वेळेत नागरिकांना सुरक्षित आणि अडथळामुक्तपणे चालता यावे, यासाठी पदपथ आणि वाहतूक मार्गांचे सुसूत्र नियोजन करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत गुरुवारी त्यांनी मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग आणि घाटकोपर परिसरातील विविध ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली.

सुमारे तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी पदपथांवरील अतिक्रमणे, फेरीवाले, वाहतूक व्यवस्था तसेच कचरा साचणाऱ्या ठिकाणांचा आढावा घेतला. पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले आणि इतर अडथळे तत्काळ हटवून नागरिकांसाठी पदपथ पूर्णपणे मोकळे करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मुलुंड पश्चिमेतील सरदार वल्लभभाई पटेल मार्गाचीही आयुक्तांनी पाहणी केली. या मार्गावर मोठ्या प्रमाणात नोकरदार आणि विद्यार्थ्यांची ये-जा होत असल्याने पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. उपयोगिता वाहिन्यांमुळे नागरिकांना चालताना अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी अभियांत्रिकी विभागाच्या मदतीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

भांडूप स्थानक परिसरात ९४ गाळेधारकांचे पुनर्वसन -
भांडूप रेल्वे स्थानक पश्चिम परिसरात ‘बेस्ट’ बससेवा आणि रस्ते वाहतुकीसाठी पदपथ व वाहतूक मार्गांचे स्वतंत्र नियोजन करण्याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. या परिसरातील ९४ गाळेधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन स्थानकाकडे जाणारा पदपथ नागरिकांसाठी मोकळा करण्यात येणार आहे.

कांजूरमार्गमध्ये २४ गाळे हटवणार - 
कांजूरमार्ग रेल्वे स्थानक पश्चिम परिसरातील २४ गाळे निष्कासित करून हा परिसर पादचाऱ्यांसाठी मोकळा करण्यात येणार आहे. संबंधित गाळेधारकांचे पर्यायी जागेत पुनर्वसन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. पुढील टप्प्यात लाल बहादूर शास्त्री मार्गावरील भट्टीपाडा जंक्शन येथील २६ आणि पेपरमिंट चाळ येथील २७ गाळे हटविण्यात येणार आहेत.

एस विभागातील १४ मार्गांवर तब्बल २०.५० किलोमीटर लांबीचे पदपथ पादचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

घाटकोपरमध्ये तीन किलोमीटर पदपथ अतिक्रमणमुक्त होणार - 
घाटकोपरच्या पंतनगर परिसरातील शिवाजी तंत्रशिक्षण शाळेजवळील पदपथांचीही पाहणी करण्यात आली. श्रद्धानंद मार्ग, झुनझुनवाला मार्ग, अंकुश गावडे मार्ग आणि हरिश्चंद्र देसाई मार्गासह परिसरातील मार्गांवरील अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करण्यात येणार असून, सुमारे तीन किलोमीटर लांबीचे पदपथ नागरिकांसाठी उपलब्ध होतील.

दरम्यान, पदपथांवरील अतिक्रमणांसोबतच कचरा साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांचे निर्मूलन करण्यावरही आयुक्तांनी भर दिला. मुलुंड पश्चिमेतील पंडित जवाहरलाल नेहरू मार्ग आणि भांडूप येथील बडवाईक रुग्णालय परिसरात नियमित स्वच्छता, कचरा संकलन, सीसीटीव्ही निगराणी आणि नियमभंग करणाऱ्यांकडून दंड वसुली करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बडवाईक रुग्णालय परिसरात कचरा व्यवस्थापनासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कचरा साचणाऱ्या ठिकाणाचे निर्मूलन झाले आहे. या उपक्रमाचे आयुक्तांनी कौतुक करत, त्याचा नमुना इतर प्रशासकीय विभागांमध्येही राबविण्याच्या सूचना दिल्या.

पदपथांची सुधारणा, सुशोभीकरण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने राबवून पूर्व उपनगरातील रेल्वे स्थानक परिसर अधिक पादचारीस्नेही करण्यावर महापालिकेचा भर राहणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS