
मुंबई / JPN NEWS -
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने ४६ वर्षीय महिलेच्या गर्भाशयातून तब्बल ५.५ किलो वजनाची आणि ३० सेंटीमीटर आकाराची गाठ (जायंट लिओमायोमा/फायब्रॉईड) यशस्वीरीत्या काढून वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून तिला पाच दिवसांनी घरी सोडण्यात आले.
मानखुर्द येथील ४६ वर्षीय महिलेला गेल्या दोन वर्षांपासून पोटाची वाढती सूज, बोथट पोटदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. या तक्रारींमुळे तिने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमीदास व्होरा महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय (राजावाडी रुग्णालय) येथील स्त्रीरोग विभागात उपचार सुरू केले.
रुग्णाची वैद्यकीय तपासणी, शारीरिक परीक्षण आणि विविध चाचण्यांनंतर गर्भाशयात सुमारे ३० सेंटीमीटर आकाराची मोठी गाठ असल्याचे निदान झाले. प्राथमिक निदानानुसार ही जायंट लिओमायोमा (Giant Leiomyoma/Fibroid) असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. ट्युमरचा मोठा आकार आणि त्यातील रक्तवाहिन्यांचे जाळे लक्षात घेऊन डॉक्टरांनी अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करून शस्त्रक्रिया केली.
या शस्त्रक्रियेत स्त्रीरोग विभागातील डॉ. स्वाधिना बी. मोहंती, डॉ. शालिनी बगारिया, डॉ. अरवा कांबळे आणि डॉ. काजल साळवी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भूलतज्ज्ञ डॉ. छवी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रेयश आणि डॉ. नेत्रा यांनी भूल विभागाची जबाबदारी सांभाळली. तसेच स्टाफ नर्स नीलाक्षी गुरव आणि त्यांच्या टीमनेही शस्त्रक्रियेत महत्त्वाचे सहकार्य केले.
शस्त्रक्रियेदरम्यान काढण्यात आलेला ५.५ किलो वजनाचा ट्युमर पुढील हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणीसाठी पाठविण्यात आला असून त्याचा अंतिम अहवाल प्रतीक्षेत आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर विशेष वैद्यकीय देखरेख ठेवण्यात आली. प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्यानंतर शस्त्रक्रियेनंतर पाचव्या दिवशी तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, गर्भाशयातील इतक्या मोठ्या आकाराच्या गाठीची प्रकरणे अत्यंत दुर्मिळ असतात. अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्याची क्षमता राजावाडी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.


No comments:
Post a Comment