‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश गणेशोत्सवातून द्या - मंगल प्रभात लोढा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 August 2026

‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश गणेशोत्सवातून द्या - मंगल प्रभात लोढा


मुंबई JPN NEWS | ११ ऑगस्ट २०२६ -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचा संदेश गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांनी यंदाच्या देखाव्यांमध्ये आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये अमली पदार्थांविरोधातील जनजागृतीला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.

नाना चौक येथील महापालिकेच्या डी विभाग कार्यालयात मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांसोबत आयोजित समन्वय बैठकीत लोढा बोलत होते. बैठकीला ७० हून अधिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, समन्वय समितीचे प्रतिनिधी, महापालिका, पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दल, बेस्ट, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

“सार्वजनिक गणेशोत्सवाला जनजागृतीची मोठी परंपरा आहे. मंडळांनी देखावे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजाला ड्रग्जच्या समस्येविरोधात एकत्र आणावे. तरुणांमध्ये जागृती निर्माण करून अधिकाधिक नागरिकांनी ‘ड्रग्स फ्री मुंबई’ची शपथ घ्यावी,” असे लोढा यांनी सांगितले.

वन विंडो परवानगीची मागणी - 
गणेशोत्सव मंडळांना महापालिका, पोलीस आणि वाहतूक पोलिसांच्या विविध परवानग्या वन विंडो पद्धतीने मिळाव्यात, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश लोढा यांनी दिले. गणेशोत्सव काळात नागरिक आणि भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

भव्य कृत्रिम तलाव उभारण्याच्या सूचना -
समुद्रात किंवा बाणगंगेत गणेशमूर्ती विसर्जनाची मागणी गणेश मंडळांकडून करण्यात आली असून, या विषयावर न्यायालयीन सुनावणी सुरू आहे. मंडळांची भव्य विसर्जनाची भावना लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे लोढा यांनी सांगितले.

ऑगस्ट क्रांती मैदान येथे ५ ते ६ फूट उंचीचा विस्तृत कृत्रिम तलाव उभारण्याच्या शक्यतेचा अभ्यास करावा, तसेच इतर संभाव्य विसर्जनस्थळांची पाहणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.

गिरगाव चौपाटीवरील निर्माल्य वेळेत उचलण्यासाठी दिवसातून दोन वेळा कचरा गाडी उपलब्ध करून द्यावी. समुद्रात विसर्जन झाल्यानंतर मूर्तींची विल्हेवाट तातडीने लावावी, अशा सूचनाही देण्यात आल्या.

वाहतूक, सुरक्षा आणि वीजपुरवठ्यावर भर - 
गणेश मंडळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहत असल्याने आवश्यक ठिकाणी ‘नो पार्किंग’ फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. गिरगाव चौपाटी आणि समुद्रकिनारी भाविकांच्या सुरक्षेसाठी गरजेनुसार लाइफगार्डची संख्या वाढविण्यात येणार आहे.

समुद्रातील भरती-ओहोटीची माहिती गणेश मंडळांना वेळेवर मिळावी, यासाठी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून नियमित माहिती देण्याची व्यवस्था करण्याची सूचनाही करण्यात आली.

गणपती आगमनाच्या मार्गावरील खड्डे तातडीने बुजवणे, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे आणि अनावश्यक केबल वायर हटविण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले.

खेतवाडी परिसरात पावसामुळे पाणी साचत असल्याने डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढू नये यासाठी नियमित औषध फवारणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच खेतवाडी येथील शाळेत हिरकणी कक्ष सुरू करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.

गणेशोत्सवाच्या काळात वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी बेस्टने आवश्यक उपाययोजना करून रात्रीच्या वेळी मुबलक वीजपुरवठा सुनिश्चित करावा, असे निर्देश लोढा यांनी दिले. मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील प्रमुख चौकांवर विद्युत रोषणाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

गिरगाव चौपाटीवर १३ कृत्रिम तलाव - 
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या डी विभागाने गिरगाव चौपाटीवर विविध कामांना सुरुवात केली आहे. वाळूमध्ये वाहने रुतू नयेत यासाठी १,१९४ फ्लेट्स बसविण्यात येणार आहेत. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांसाठी वॉच टॉवर उभारण्यात येणार आहे.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर १३ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात येणार असून, गर्दी आणि सुरक्षेचे नियोजन करण्यासाठी महापालिका व पोलीस यंत्रणा सज्ज होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS