ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ बेस्ट बसचा अपघात; दोघे जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 September 2026

ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ बेस्ट बसचा अपघात; दोघे जखमी


मुंबई JPN NEWS - दिंडोशी डेपोच्या बेस्ट बसचा सोमवारी (१४ सप्टेंबर) सायंकाळी ओबेरॉय मॉल सिग्नल परिसरात अपघात झाला. खासगी कारला घासल्यानंतर बस मेट्रोच्या खांबावर धडकल्याने दोन जण जखमी झाले. दोघांवर जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, बेस्टची बस क्रमांक ७६४० (MH-01-DR-4295) दिंडोशी डेपो येथून भायंदर स्थानक पूर्वच्या दिशेने जात होती. सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास ओबेरॉय मॉलसमोरील उड्डाणपुलाखालील सिग्नलजवळ बस उजवीकडे वळत असताना तिचा खासगी कार क्रमांक MH-47-BP-6483 च्या मागील उजव्या बाजूला घास लागला. त्यानंतर बस मेट्रो रेल्वेच्या खांबावर जाऊन आदळली.

या अपघातात बेस्टचे कर्मचारी राजेंद्र मुरलीधर सोनावणे (५८) आणि प्रवासी मंगेश रामचंद्र मोडलेकर (५७) जखमी झाले. सोनावणे यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना तीन टाके पडले. तर मोडलेकर यांच्या हनुवटीला आणि डोक्याला दुखापत झाली. त्यांच्या हनुवटीला एक आणि डोक्याला पाच टाके पडले.

अपघाताची माहिती मिळताच माटेश्वरी विभागाचे अपघात निरीक्षक कुलकर्णी यांनी दोन्ही जखमींना तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. अपघात विभागाचे विशेष निरीक्षक नवले यांनीही घटनास्थळी आणि रुग्णालयातील कार्यवाहीत मदत केली.

दरम्यान, वनराई पोलिसांच्या सूचनेनुसार बेस्टच्या टोइंग वाहनाच्या मदतीने अपघातग्रस्त बस वनराई पोलीस ठाण्यासमोर नेऊन उभी करण्यात आली. खासगी कारच्या चालकाने दिलेल्या तक्रारीवरून बसचालकाविरुद्ध TAR-478/2026 क्रमांकाने गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अपघातानंतर दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री १०.४५ वाजताच्या अद्ययावत माहितीनुसार, उपचारानंतर दोघांनाही रुग्णालयातून सोडण्यात आले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS