अनंत चतुर्दशीसाठी गिरगाव चौपाटी सज्ज; पालिकेचा प्रथमच आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष कार्यरत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 September 2026

अनंत चतुर्दशीसाठी गिरगाव चौपाटी सज्ज; पालिकेचा प्रथमच आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष कार्यरत


मुंबई JPN NEWS - अनंत चतुर्दशीनिमित्त २५ सप्टेंबर रोजी स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे होणाऱ्या श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. लाखो भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पालिकेकडून विविध नागरी सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यंदा प्रथमच गिरगाव चौपाटी परिसरात व्यापक स्वरूपात ‘आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष’ (Emergency Management Control Room) कार्यरत करण्यात आला आहे.

स्वराज्यभूमी येथे श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी करण्यात आलेल्या तयारीचा स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी आज आढावा घेतला. त्यांनी लहान तसेच मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. तसेच परदेशी पर्यटक आणि विविध देशांच्या दूतावासांच्या राजदूतांसाठी उभारण्यात आलेल्या दालनाची पाहणी केली. पालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांचीही त्यांनी माहिती घेतली.

गिरगाव चौपाटी परिसरात लाखो भाविक येण्याची शक्यता असल्याने पथदिवे, पिण्याचे पाणी, तात्पुरती स्वच्छतागृहे, प्रथमोपचार केंद्रे, रुग्णवाहिका, सुरक्षा व गर्दी व्यवस्थापन तसेच मूर्ती विसर्जनासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांमध्ये तातडीने समन्वय साधता यावा यासाठी उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह बेस्ट, मुंबई पोलीस, मुंबई अग्निशमन दल, आरोग्य विभाग, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक आणि अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे हॅम रेडिओ चालक उपस्थित राहणार आहेत. समन्वयासाठी भ्रमणध्वनी, डिजिटल मोबाईल रेडिओ आणि हॅम रेडिओ यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गिरगाव चौपाटी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी डी विभागाकडून नियंत्रण कक्षात स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विसर्जनादरम्यान दुर्घटना घडल्यास तातडीने माहिती मिळावी यासाठी दोन ड्रोनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षामार्फत अग्निशमन दल, पोलीस, आरोग्य विभाग, किनारी सुरक्षा यंत्रणा आणि अन्य संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे.

दरम्यान, मंडपाला आग लागणे, समुद्रात व्यक्ती बुडणे यांसारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजनांबाबत डी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २४ सप्टेंबर रोजी प्रशिक्षण देण्यात आले.

स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्या पाहणीवेळी स्थानिक नगरसेवक गौरांग झवेरी, माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाठ, डी विभागाचे अभियंता रावसाहेब सांगोलकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS