‘खंडणीचे आरोप करताय, तर पुरावे द्या’; तुकाराम मुंढेंचा संजय राऊतांना थेट सवाल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 September 2026

‘खंडणीचे आरोप करताय, तर पुरावे द्या’; तुकाराम मुंढेंचा संजय राऊतांना थेट सवाल


मुंबई JPN NEWS - हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांसह क्विक कॉमर्स कंपन्यांकडून अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अधिकाऱ्यांकडून कथितपणे पैशांची मागणी केली जात असल्याच्या आरोपांनी आता नवे वळण घेतले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट प्रतिक्रिया देत, आरोपांमध्ये तथ्य असेल तर ठोस पुरावे सादर करा, असे आव्हान दिले आहे.

राऊत यांनी FDAच्या काही अधिकाऱ्यांकडून हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना धमकावून तसेच परवाने निलंबित करण्याची भीती दाखवून पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप केला होता. अशा प्रकारची कथित वसुली पूर्वीपेक्षा अधिक वाढल्याचा दावाही त्यांनी केला होता.

या आरोपांवर बोलताना तुकाराम मुंढे यांनी आरोपांचे स्वरूप सर्वसाधारण असल्याचे सांगितले. संबंधित प्रकरणात कोणत्या अधिकाऱ्याने, कोणाकडे, किती रकमेची मागणी केली, याचा तपशील आणि पुरावे समोर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘माझ्याकडे राऊतांचे पत्र आलेले नाही’ - 
संजय राऊत यांनी आपल्याला पत्र पाठवल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात असे कोणतेही पत्र आपल्याला प्राप्त झालेले नसल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. मात्र, माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमधून या आरोपांची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

आरोप करणाऱ्यांकडे जर प्रत्यक्ष माहिती किंवा पुरावे असतील, तर ते FDA प्रशासनाकडे सादर करावेत. तसेच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल करूनही कारवाईची मागणी करता येईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.

‘पैसे मागितले असतील तर पुढे या’ - 
FDAच्या कोणत्याही अधिकाऱ्याने पैशांची मागणी केली असल्याचा अनुभव एखाद्या परवानाधारकाला आला असेल किंवा कोणाकडून पैसे स्वीकारण्यात आले असतील, तर संबंधित व्यक्तीने पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहन मुंढे यांनी केले.

तक्रारदारांनी संबंधित अधिकाऱ्याचे नाव, पैशांची मागणी कशासाठी करण्यात आली, रक्कम किती होती, व्यवहार कुठे झाला आणि त्यासंदर्भातील उपलब्ध पुरावे प्रशासनाला द्यावेत, असे त्यांनी सांगितले.

आरोपांची सत्यता तपासण्याचे आव्हान - 
दरम्यान, राऊत यांनी केलेले आरोप आणि त्यावर मुंढे यांनी मागितलेले पुरावे यामुळे FDAच्या कारभारावरून सुरू झालेला वाद अधिक चर्चेत आला आहे. आता या आरोपांच्या समर्थनार्थ ठोस तक्रारी किंवा पुरावे समोर येतात का आणि त्याआधारे प्रशासन किंवा ACBकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS