
मुंबई JPN NEWS - कर्जत येथील प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्पावरून वृक्षतोडीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू आणि काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मध्य वैतरणा धरणाच्या बांधकामासाठी झालेल्या वृक्षतोडीच्या बदल्यात बीड जिल्ह्यातील १३ गावांमध्ये दोन लाख झाडे लावण्यासाठी मुंबई महापालिकेने निधी खर्च केला होता. ठाकरे बंधू आणि काँग्रेसने बीडमध्ये जाऊन ही झाडे जनतेला दाखवावीत, असे आव्हान साटम यांनी दिले.
भाजप प्रदेश कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कर्जत येथील प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्पातील वृक्षतोडीवरून राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना त्यांनी उत्तर दिले.
‘पर्यावरणावर बोलणे म्हणजे विरोधकांसाठी फॅशन’ -
मध्य वैतरणा धरणासाठी झाडे कापल्यानंतर त्याच्या बदल्यात बीड जिल्ह्यातील १३ गावांमध्ये ५४० हेक्टर क्षेत्रावर दोन लाख झाडे लावण्यासाठी मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा दावा साटम यांनी केला. त्या वृक्षलागवडीच्या ठिकाणी ठाकरे बंधू आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहावी, असेही ते म्हणाले.
शाश्वत विकास ही भाजपची बांधिलकी असून विरोधकांसाठी पर्यावरणाचा मुद्दा केवळ राजकीय फॅशन असल्याची टीका त्यांनी केली. ठाकरे बंधू आणि काँग्रेस पर्यावरणाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कर्जत प्रकल्प ३ हजार मेगावॅटचा असल्याचा दावा -
कर्जत येथील पंप स्टोरेज प्रकल्प हा स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी महत्त्वाचा असल्याचे साटम यांनी सांगितले. हा प्रकल्प ३ हजार मेगावॅट क्षमतेचा असून ३७७ हेक्टर क्षेत्रावर उभारला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
इतक्याच क्षमतेच्या औष्णिक वीज प्रकल्पासाठी यापेक्षा कितीतरी अधिक जागा लागेल आणि मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी लागेल, असा दावाही त्यांनी केला. भारताची पंप स्टोरेज वीज निर्मिती क्षमता जागतिक क्षमतेच्या तुलनेत कमी असल्याचे सांगत या क्षेत्रात देशाने वेगाने प्रगती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
विरोधकांवर गंभीर आरोप -
देशात नवे विकास प्रकल्प उभे राहत असताना काही घटकांकडून त्यांना विरोध केला जात असल्याचा आरोप साटम यांनी केला. या विरोधामागे परदेशी मदत आणि शहरी नक्षलवादी घटक असल्याचा दावा करत त्यांनी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि काही अभिनेत्यांवरही टीका केली.
कर्जत प्रकल्पातून गुजरातला वीज पुरवली जाणार असल्याचे कथानक पसरवले जात असल्याचा आरोप त्यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे केला. तसेच महाराष्ट्राच्या विकासाला विरोध करणारे घटक राज्याच्या प्रगतीत अडथळे निर्माण करत असल्याचेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेत साटम यांनी बीड जिल्ह्यात वृक्षलागवडीसाठी निवडण्यात आलेल्या १३ गावांतील ठिकाणांची छायाचित्रे दाखवली. मात्र, या वृक्षलागवडीची सद्यस्थिती आणि प्रत्यक्षात किती झाडे जगली आहेत, याबाबत स्वतंत्र पडताळणी आवश्यक आहे.


No comments:
Post a Comment