
मुंबई JPN NEWS - अंगणवाडी आणि शालेय पोषण आहार पुरवठ्याचे काम स्थानिक महिला बचत गटांकडून काढून इस्कॉनला देण्याच्या निर्णयाला विरोध करत अंगणवाडी कर्मचारी आणि महिला बचत गटांनी मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र आंदोलन केले. सेंट्रल किचनचा निर्णय रद्द करून स्थानिक महिलांचा रोजगार सुरक्षित ठेवावा, अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्यावा आणि पूर्ण प्रोत्साहन भत्ता मंजूर करावा, अशा प्रमुख मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू)च्या नेतृत्वाखाली हा लढा राज्यभर उभारण्याचा निर्धारही संघटनांनी व्यक्त केला.
२७ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या या आंदोलनात नागपूर, वर्धा, मुंबई आणि यवतमाळ येथील महिला बचत गटांच्या प्रतिनिधींसह मुंबई व ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. आहार पुरवठादार संघटना आणि अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.
सेंट्रल किचनच्या निर्णयाला विरोध -
स्थानिक महिला बचत गट आणि महिला संस्थांकडून वर्षानुवर्षे अंगणवाडी व शालेय पोषण आहाराचे काम केले जात आहे. मात्र, हे काम इस्कॉनला देण्याच्या निर्णयामुळे हजारो महिलांच्या रोजगारावर संकट निर्माण झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. हा निर्णय तातडीने रद्द करून स्थानिक महिला बचत गटांकडेच आहार पुरवठ्याचे काम कायम ठेवावे, अशी मागणी करण्यात आली.
अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्याध्यक्षा शुभा शमीम यांनी आंदोलनाला मार्गदर्शन करताना सेंट्रल किचनचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत रद्द झाला पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडली. महिला सक्षमीकरणाच्या घोषणा करणाऱ्या सरकारकडूनच कष्टकरी महिलांच्या रोजगारावर गदा आणली जात असल्याची टीका त्यांनी केली.
महिला बचत गटांना दोन-दोन वर्षे आहाराची बिले मिळाली नसतानाही त्यांनी मुलांच्या आहारपुरवठ्यात खंड पडू दिला नाही. महागाई, अपुरा मोबदला आणि आर्थिक अडचणींचा सामना करूनही महिलांनी आपले काम सुरू ठेवले. अशा महिलांचे काम मोठ्या संस्थांकडे सोपवण्याऐवजी त्यांना योग्य दर, वेळेवर बिले आणि आर्थिक संरक्षण द्यावे, असे शमीम यांनी सांगितले.
१० हजार रुपये बोनस, पूर्ण प्रोत्साहन भत्त्याची मागणी -
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीनिमित्त केवळ तुटपुंजे भाऊबीज अनुदान न देता १० हजार रुपये बोनस द्यावा, अशी मागणी संघटनेने केली. तसेच प्रोत्साहन भत्त्यासाठीचे निकष बदलून कर्मचाऱ्यांना पूर्ण प्रोत्साहन भत्ता मिळावा, अशी मागणीही करण्यात आली.
सीटूचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी आंदोलनाला पाठिंबा देत कामगार आणि कष्टकरी महिलांच्या हक्कांसाठी एकजुटीने संघर्ष करण्याचे आवाहन केले. स्थानिक महिला बचत गटांचा रोजगार हिरावून घेण्याचा प्रयत्न संघटित लढ्याच्या माध्यमातून हाणून पाडला पाहिजे, असे ते म्हणाले.
थकीत पैसे द्या; महिलांच्या श्रमांचा सन्मान करा -
अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कोषाध्यक्ष आरमायटी इराणी यांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेल्या अंगणवाडी मदतनीसांची प्रलंबित देणी तातडीने देण्याची मागणी केली. महिलांकडून काम करून घेऊन त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे वेळेवर न देणे अन्यायकारक असल्याचे सांगत त्यांनी सरकारला महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशारा दिला.
संघटनेच्या उपाध्यक्षा शशी काळे यांनी महिला व बालविकास विभागाने बंद केलेल्या सात कल्याणकारी योजना पुन्हा सुरू करण्याची आणि लाडकी बहीण योजनेचे थांबलेले हप्ते तातडीने वितरित करण्याची मागणी केली.
मंत्रालयात अधिकाऱ्यांसोबत चर्चा -
आंदोलनानंतर अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महासचिव संगीता कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्रालयात महिला व बालविकास विभागाचे उपसचिव ठाकूर आणि अतिरिक्त सचिव सरदार यांची भेट घेतली. या वेळी अंगणवाडी सेविका-मदतनीस, महिला बचत गट आणि आहार पुरवठादारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
महिला व बालविकास मंत्री बैठकीसाठी उपलब्ध नसल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात आले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसमोर मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्या मंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात येतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे संघटनेने सांगितले.
या आहेत प्रमुख मागण्या -
- इस्कॉनला आहार पुरवठ्याचे काम देण्याचा निर्णय रद्द करून स्थानिक महिला बचत गट व संस्थांकडेच काम कायम ठेवावे.
- अंगणवाडी सेविका व मदतनीसांना १० हजार रुपये दिवाळी बोनस द्यावा.
- प्रोत्साहन भत्त्याचे निकष बदलून पूर्ण भत्ता द्यावा.
- लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेल्या पात्र मदतनीसांची प्रलंबित देणी अदा करावीत आणि योजनेचे थांबलेले हप्ते सुरू करावेत.
- मोबाईल रिचार्जचे दोन वर्षांचे प्रलंबित पैसे द्यावेत आणि रिचार्जची रक्कम वाढवावी.
- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात वाढ करावी.
- आहार पुरवठादारांची थकीत बिले द्यावीत आणि महागाईनुसार आहाराचे दर वाढवावेत.
- महिला व बालविकास विभागाने बंद केलेल्या सात कल्याणकारी योजना पुन्हा सुरू कराव्यात.
राज्यव्यापी संघर्षाचा इशारा -
स्थानिक महिला बचत गटांचा रोजगार सुरक्षित ठेवणे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि त्यांना हक्काचा मोबदला मिळवून देणे यासाठी राज्यव्यापी संघर्ष उभारण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. मंत्रालयातील चर्चेनंतरही मागण्यांवर ठोस निर्णय झाला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याची भूमिका संघटनांनी घेतली आहे.


No comments:
Post a Comment