
मुंबई JPN NEWS - मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आठवड्यातून एक दिवस सर्व बांधकामे आणि पाडकामे बंद ठेवण्याची सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून हिवाळ्यात वाढू शकणाऱ्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर तातडीने प्रभावी उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.
मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावत असल्याबाबत नागरिकांकडून अनेक निवेदने प्राप्त झाली आहेत. मुंबई उच्च न्यायालयानेही या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली असल्याचे शेलार यांनी पत्रात नमूद केले आहे. महापालिकेकडून बांधकामस्थळांवरील प्रदूषण नियंत्रण, विभागस्तरीय तपासणी पथके, केंद्रीय हवा गुणवत्ता डॅशबोर्डद्वारे ३,१६६ बांधकामस्थळांवर देखरेख, राडारोडा नियंत्रण आणि बेकऱ्या व स्मशानभूमींमधील प्रदूषण कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे त्यांनी स्वागत केले. २०१७-१८ पासून मुंबईतील पीएम-१० प्रदूषणाच्या पातळीत सुमारे ४८ टक्के घट झाल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले. मात्र, प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी व्यापक उपाययोजनांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रदूषण नियंत्रणासाठी स्वतंत्र कृती आराखडा -
मुंबईसाठी स्वतंत्र श्रेणीबद्ध कृती आराखडा (Graded Response Action Plan) तयार करावा. हवेची गुणवत्ता खालावताच पूर्वनिश्चित उपाययोजना तातडीने लागू होतील, अशी व्यवस्था असावी, अशी सूचना शेलार यांनी केली आहे. प्रदूषणग्रस्त भाग आणि प्रमुख वाहतूक मार्गांवर प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करून रस्ते धुणे, पाण्याची फवारणी करणे, रात्रीच्या वेळी यांत्रिक पद्धतीने रस्ते स्वच्छ करणे, खड्डे तातडीने बुजवणे आणि खोदकामानंतर रस्ते वेळेत पूर्ववत करणे, यावरही त्यांनी भर दिला.
कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई; अँटी-स्मॉग गनचा वापर -
कचरा जाळणे, कचरा डेपोमध्ये आग लागणे आणि बांधकामाचा राडारोडा बेकायदेशीरपणे टाकणे अशा घटनांची तक्रार करण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन आणि समाजमाध्यम खाते सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारींवर तातडीने कारवाई करून दोषींना दंड ठोठावावा आणि कार्यवाहीचा साप्ताहिक अहवाल प्रसिद्ध करावा, असेही त्यांनी सुचवले. प्रदूषणाची तीव्रता अधिक असलेल्या भागांत आणि प्रमुख वाहतूक चौकांमध्ये अँटी-स्मॉग गन व मिस्ट स्प्रेअरचा वापर करण्याची सूचनाही त्यांनी केली.
धूर सोडणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई -
मुंबई वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या समन्वयातून धूर सोडणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रांची तपासणी वाढवावी आणि वैध प्रमाणपत्र नसलेल्या अवजड वाहनांना मुंबई महापालिका क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. बांधकामस्थळांवर सेन्सर-आधारित हवा गुणवत्ता निरीक्षण यंत्रणा बसवण्याची प्रलंबित कार्यवाही पूर्ण करावी, तसेच लाकूड किंवा कोळशाचा वापर करणाऱ्या उर्वरित ८७ बेकऱ्यांचे स्वच्छ इंधनावर रूपांतर करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
उद्योगांना हरित इंधनाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन -
मुंबई महानगर प्रदेशातील उद्योगांकडून ऊर्जा आणि इंधनासाठी सुमारे २० लाख टन कोळसा वापरला जात असल्याचा उल्लेख सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंटच्या अहवालाच्या आधारे शेलार यांनी केला आहे. उद्योगांनी कोळशाऐवजी स्वच्छ आणि हरित इंधनाचा वापर करावा, यासाठी कमी व्याजदराची कर्जे, सरकारी करांमध्ये सवलती आणि हरित ऊर्जा निधीतून आर्थिक मदत देण्याचा विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली.
मुंबई आणि परिसरातील सार्वजनिक तसेच खासगी वाहतूक वाहनांचे विद्युतीकरण करण्यासाठी प्रोत्साहनपर योजना राबवाव्यात. या प्रक्रियेत वाहन उद्योग आणि खासगी कंपन्यांचा सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
नागरिक आणि उद्योग क्षेत्राच्या सहभागावर भर -
वायुप्रदूषणाविरोधातील लढ्यात नागरिक, युवक आणि उद्योग क्षेत्राचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. मुंबईतील सर्व २६ प्रशासकीय विभागांमध्ये नागरिकांच्या संघटना, लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय विभागांच्या बैठका घेऊन स्थानिक समस्यांवर उपाययोजना निश्चित कराव्यात. तसेच उद्योग क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत स्वतंत्र बैठक घेऊन प्रदूषण नियंत्रणासाठी तांत्रिक मदत, सहकार्य आणि आर्थिक सहभाग मिळवावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
मुंबईतील वायुप्रदूषण ही नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीवनमानाशी निगडित गंभीर समस्या आहे. त्यामुळे विविध सरकारी विभागांमध्ये समन्वय साधून तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याची गरज असल्याचे अॅड. आशिष शेलार यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.


No comments:
Post a Comment