
मुंबई JPN NEWS - मुंबईतील वाढते वायुप्रदूषण आणि रस्त्यांवरील धुळीच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत स्वतंत्र ‘हायड्रंट पॉलिसी’ लागू करावी, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे. मुंबईतील रस्त्यांवर पूर्वीपासून असलेले बंद आणि नादुरुस्त हायड्रंट पुन्हा कार्यान्वित करावेत, तसेच गरजेनुसार नवीन हायड्रंट उभारावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुंबईतील रस्ते धुण्यासाठी जेटिंग यंत्रणेसह पाण्याचे टँकर भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर मांडण्यात आला होता. मात्र, हा प्रस्ताव मागे घेण्यात आल्यानंतर रस्त्यांवरील धूळ आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी व्यवस्था उभारण्याची गरज असल्याचे आझमी यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
पूर्वी मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाण्याचे हायड्रंट उपलब्ध होते. मात्र, रस्ते आणि पदपथांची कामे तसेच विविध पायाभूत सुविधा आणि विकासप्रकल्पांमुळे अनेक हायड्रंट बंद पडले किंवा वापरातून बाहेर गेले. त्यामुळे संपूर्ण मुंबईतील हायड्रंटचे सर्वेक्षण करून त्यांची सद्यस्थिती तपासावी, बंद आणि नादुरुस्त हायड्रंटची यादी तयार करावी आणि आवश्यक दुरुस्ती करून ते पुन्हा कार्यान्वित करावेत, असे आझमी यांनी सुचविले आहे.
टँकरवरील अवलंबित्व कमी होण्याची अपेक्षा -
मुंबईतील प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते आणि धुळीचे प्रमाण अधिक असलेल्या परिसरांमध्ये नियमित पाणी मारण्यासाठी हायड्रंटचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे रस्त्यांवरील धूळ कमी करण्यास आणि स्वच्छता राखण्यास मदत होईल. हायड्रंटची सुविधा उपलब्ध झाल्यास रस्ते धुण्यासाठी पाण्याच्या टँकरवर असलेले अवलंबित्व कमी होण्याबरोबरच महापालिकेच्या खर्चातही बचत होण्याची शक्यता असल्याचे आझमी यांनी म्हटले आहे.
अग्निशमन दल आणि उद्यानांसाठीही उपयोग -
हायड्रंटची व्यवस्था केवळ रस्ते धुण्यापुरती मर्यादित न ठेवता अग्निशमन दल आणि सार्वजनिक उद्यानांच्या पाणीपुरवठ्यासाठीही तिचा नियोजनबद्ध वापर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आगीच्या घटनांमध्ये आवश्यक ठिकाणी कार्यरत हायड्रंट उपलब्ध असल्यास अग्निशमन दलाला पाणी मिळविण्यास मदत होऊ शकते. तसेच रस्त्यांच्या कडेला, दुभाजकांमध्ये आणि सार्वजनिक जागांतील झाडांना पाणी देण्याची व्यवस्थाही अधिक सक्षम करता येईल.
सर्व विभागांच्या समन्वयातून धोरण तयार करण्याची मागणी -
महापालिकेच्या जल अभियंता विभाग, अग्निशमन दल, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि उद्यान विभाग यांच्यात समन्वय साधून सर्वसमावेशक हायड्रंट पॉलिसी तयार करावी, अशी मागणी आझमी यांनी केली आहे. या धोरणात हायड्रंटची ठिकाणे, पाण्याची उपलब्धता, नियमित देखभाल, वापराचे नियोजन आणि आपत्कालीन परिस्थितीतील कार्यपद्धती निश्चित करावी. ज्या भागांत हायड्रंट उपलब्ध नाहीत, तेथे तांत्रिक व्यवहार्यतेचा अभ्यास करून नवीन हायड्रंट उभारण्याचा विचार करावा, असेही त्यांनी सुचविले आहे.
मुंबईतील वायुप्रदूषण आणि धुळीच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासोबतच नागरी सुविधांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, असे आझमी यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.


No comments:
Post a Comment