कृषी विद्यापीठातील कथित १०० कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी करा; आझाद समाज पार्टीचे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 October 2026

कृषी विद्यापीठातील कथित १०० कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी करा; आझाद समाज पार्टीचे आंदोलन


मुंबई JPN NEWS - परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कथित १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आझाद समाज पार्टी (कांशीराम), महाराष्ट्र राज्याच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणाशी संबंधित दोन अहवालांमध्ये आर्थिक अनियमिततांबाबत निष्कर्ष नोंदवण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

या अहवालांतील निष्कर्षांची अधिकृत माहिती सार्वजनिक करावी आणि त्याआधारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, नियंत्रक अनंत कदम आणि अभियंता दीपक कशाळकर यांच्यासह संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणीही पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. चौकशीत गैरव्यवहार सिद्ध झाल्यास नियमानुसार प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, तसेच सार्वजनिक निधीचा गैरवापर झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांकडून रक्कम वसूल करावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा मुद्दा -
विद्यापीठाचा निधी हा शेतकरी, विद्यार्थी आणि सार्वजनिक हिताशी संबंधित असल्याने या प्रकरणाची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. आर्थिक व्यवहारांमधील अनियमिततेची पारदर्शक चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शासनाने चौकशी आणि पुढील कारवाईसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, असेही पक्षाने म्हटले आहे.

पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा -
या बेमुदत धरणे आंदोलनाला आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आझाद मैदानावर उपस्थित राहून पाठिंबा दिला. यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष सुमित साबळे, मुंबई प्रदेश अध्यक्ष कैलास जयस्वार, भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे, प्रदेश सचिव आशिष नगराळे, प्रदेश सचिव तथा ठाणे जिल्हा प्रभारी संदेश सकपाळ, युवा प्रदेश महासचिव संदीप मोरे, ठाणे शहराचे कोषाध्यक्ष हुसेन शेख, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष भाग्यश्री गायकवाड, ठाणे शहर युवा अध्यक्ष साहिल खरात, ओंकार कांबळे आणि आदर्श शिवशंकर यांचा समावेश होता.

अरविंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन -
या आंदोलनाचे नेतृत्व आझाद समाज पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी अरविंद कांबळे करीत आहेत. त्यांच्यासोबत मराठवाडा कार्याध्यक्ष तातेराव ससाणे, जिल्हा प्रभारी राहुल साबळे, जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे आणि युवा जिल्हा सचिव मनीष शेळके यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

विद्यापीठातील कथित आर्थिक गैरव्यवहारासंबंधी दोन्ही अहवालांची माहिती सार्वजनिक करणे, संबंधितांची निष्पक्ष चौकशी करणे, दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करणे आणि सार्वजनिक निधीच्या वापरात पारदर्शकता सुनिश्चित करणे, या प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी मांडल्या आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन नियमानुसार कारवाई करावी, असे आवाहन आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र राज्य शाखेने केले आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS