एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यांसाठी निधी देणार; मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 October 2026

एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यांसाठी निधी देणार; मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन


मुंबई JPN NEWS - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांची थकीत देणी भागविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी शुक्रवारी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), उपदान (ग्रॅच्युइटी) आणि अन्य आर्थिक देणी दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. दिवाळीपूर्वी ही देणी भागविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास सरकारकडून विलंब होत असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे बरगे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांची दादर येथे भेट - 
श्रीरंग बरगे यांनी गुरुवारी रात्री दादर येथे एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक देण्यांबाबत सविस्तर माहिती देत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आवश्यक निधी देण्याचे आश्वासन दिल्याचे बरगे यांनी सांगितले.

१,३५४ कोटींची मागणी; प्रत्यक्षात ३९१ कोटींचा निधी - 
एसटी महामंडळाने ऑक्टोबर महिन्याचे वेतन आणि अन्य थकीत देणी भागविण्यासाठी राज्य सरकारकडे १,३५४.५४ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ ३९१ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आल्याने महामंडळाच्या आर्थिक अडचणी वाढल्याचा दावा बरगे यांनी केला.

५,७४० कोटींहून अधिक देणी प्रलंबित - 
गेल्या दोन ते तीन वर्षांतील एसटी कर्मचाऱ्यांची ५,७४० कोटी रुपयांहून अधिक देणी प्रलंबित असल्याचे बरगे यांनी सांगितले. यामध्ये भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीपोटी संबंधित विश्वस्त मंडळाकडे जमा न झालेल्या सुमारे ३,३५० कोटी रुपयांचाही समावेश आहे.

वेतनवाढीच्या फरकापोटी सरकारने ५९७.१२ कोटी रुपये मंजूर केले असले, तरी ही रक्कम अद्याप महामंडळाला प्रत्यक्ष मिळालेली नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांच्या देणी रखडली - 
एसटी महामंडळाचा संचित तोटा वाढत असून अपेक्षित प्रवासी उत्पन्न मिळत नसल्याने दैनंदिन आर्थिक व्यवहार सांभाळणे कठीण होत असल्याचे बरगे यांनी सांगितले. त्यातच कर्मचाऱ्यांचे वेतन, पीएफ, ग्रॅच्युइटी आणि अन्य देयकांची थकबाकी वाढत असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या सर्व प्रलंबित देण्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे बरगे यांनी स्पष्ट केले. यावेळी राहुल माने, अमोल पोळ, अमृत पवार आणि औदुंबर कुंभारकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS