चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबई, ठाण्यात पावसाची शक्यता; रायगड-रत्नागिरीला यलो अलर्ट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 October 2026

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबई, ठाण्यात पावसाची शक्यता; रायगड-रत्नागिरीला यलो अलर्ट

मुंबई JPN NEWS - ऑक्टोबरमधील वाढता उकाडा आणि वायू प्रदूषणाने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ‘अर्नब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत तुरळक सरींचा अंदाज

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या पावसासह मेघगर्जना होऊ शकते. मात्र, मुंबई महानगर प्रदेशासाठी स्वतंत्र इशारा जारी करण्यात आलेला नसल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

हवामान अभ्यासक महेश पलावत यांच्या म्हणण्यानुसार, चक्रीवादळाचा मुख्य प्रभाव आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड परिसरात राहिला असला, तरी त्याच्या परिणामामुळे महाराष्ट्रासह पश्चिमेकडील काही राज्यांत ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते. कोकणातील काही भागांत पुढील दोन दिवसांत तुरळक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

तापमानात घट होण्याची शक्यता - 
मुंबईत सध्या कमाल तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. गुरुवार ते शनिवार, ३१ ऑक्टोबरदरम्यान कमाल तापमानात घट होऊन ते सुमारे ३३ अंश सेल्सिअसपर्यंत येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो.

प्रदूषण कमी होण्यास मदत? - 
पावसाच्या सरींमुळे हवेत तरंगणाऱ्या धूलिकणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत तात्पुरती सुधारणा होण्याची शक्यता आहे. मात्र, हा पाऊस अल्पकाळ टिकण्याचा अंदाज असून त्यानंतर लगेच पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाच्या अंदाजात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी जारी केलेल्या यलो अलर्टमध्ये विजांचा कडकडाट, मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या ताज्या सूचनांकडे लक्ष ठेवावे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS