
मुंबई JPN NEWS - हैदराबाद येथील हुसेन सागर तलावातील भव्य बुद्ध पुतळ्याच्या धर्तीवर मुंबईतील पवई तलावाच्या मध्यभागी तथागत गौतम बुद्ध यांचा ११० फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी पवई तलाव तथागत स्मारक समितीने पुन्हा एकदा केली आहे. गेल्या १४ वर्षांपासून या मागणीसाठी पाठपुरावा सुरू असून, महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेऊन प्रकल्पाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी समितीचे संयोजक गौतम साबळे यांनी केली आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना निवेदने सादर केल्याची माहिती साबळे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. या निवेदनांच्या प्रती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, खासदार चंद्रकांत हंडोरे आणि खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
२०१२ पासून मागणीचा पाठपुरावा -
पवई तलावाच्या मध्यभागी बुद्धांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी ६ मे २०१२ रोजी आयोजित बुद्ध जयंती महोत्सवापासून सातत्याने केली जात असल्याचे समितीने म्हटले आहे. या मागणीला पवई परिसरातील नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.
समितीच्या म्हणण्यानुसार, तत्कालीन मुंबई उपनगरचे पालकमंत्री नसीम खान यांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवून पुढील कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. तसेच, १ जानेवारी २०१५ रोजी झालेल्या बैठकीत तत्कालीन महापालिका आयुक्तांनीही मागणीला मान्यता दिल्याचे समितीचे म्हणणे आहे. मात्र, त्यानंतरही प्रत्यक्ष पुतळा उभारण्याच्या दृष्टीने अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याची खंत समितीने व्यक्त केली आहे.
पवई तलावाच्या पर्यटन आकर्षणात भर पडण्याची अपेक्षा -
पवई तलावाच्या मध्यभागी ११० फूट उंचीचा पूर्णाकृती बुद्ध पुतळा उभारल्यास मुंबईच्या पर्यटन आकर्षणात भर पडेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे. पवई तलाव हे मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळ असून, बुद्ध पुतळ्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करता येईल, असे समितीचे म्हणणे आहे.
पवई तलावाचा परिसर बौद्ध इतिहासाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असल्याचे समितीने नमूद केले आहे. पवई तलावाचा विहार तलावाशी असलेला संबंध तसेच मरोळ, कोंडिविटा, कान्हेरी लेणी आणि जोगेश्वरी-बोरिवली लेणी परिसरातील बौद्ध वारशाचा संदर्भ देत, या भागात बुद्ध स्मारक उभारणे ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरेल, असा दावा करण्यात आला आहे. या स्मारकाच्या दर्शनासाठी माफक शुल्क आकारल्यास महापालिकेला महसूल मिळण्याची शक्यताही समितीने व्यक्त केली आहे.
धम्मक्रांतीच्या अमृत महोत्सवापूर्वी प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये नागपूर येथे केलेल्या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून, २०३०-३१ या कालावधीपूर्वी पवई तलावातील बुद्ध पुतळ्याचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी समितीने केली आहे. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेने या प्रस्तावावर लवकर निर्णय घेऊन प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
निवेदने जल विभागाकडे पाठविल्याबद्दल नाराजी -
या मागणीसंदर्भात दिलेली निवेदने महापालिका प्रशासनाकडून जल विभागातील सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांच्याकडे पाठविली जात असल्याबद्दल समितीने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या संबंधित वरिष्ठ यंत्रणेकडे विषय पोहोचवून ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी गौतम साबळे यांनी केली आहे.
गेल्या १४ वर्षांपासून पत्रव्यवहार आणि भेटीगाठींच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत, आता तरी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने पवई तलावातील तथागत बुद्ध स्मारकाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी अपेक्षा पवई तलाव तथागत स्मारक समितीने व्यक्त केली आहे.


No comments:
Post a Comment