साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 October 2026

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी


मुंबई JPN NEWS - आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते समाजभूषण काकासाहेब खंबाळकर आणि सामाजिक कार्यकर्ते समाजभूषण तानाजीराव कांबळे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे केली आहे. यासंदर्भात दोन्ही नेत्यांनी आयोगाला निवेदन सादर केले आहे.


हे निवेदन ७ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील आयोगाच्या कार्यालयात अनुभाग अधिकारी भारत भूषण गुप्ता यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. साहिलच्या पालकांनी त्याला जातीय भेदभाव आणि मानसिक छळाचा सामना करावा लागल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.

साहिलच्या पालकांनी न्याय मिळावा आणि संबंधितांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर खंबाळकर आणि कांबळे यांनी आयोगाकडे निवेदन देऊन प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची विनंती केली.

निवेदनातील मागण्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना यांच्याकडे पाठविण्यात येतील आणि आयोगाकडून होणाऱ्या कार्यवाहीची माहिती दिली जाईल, असे आश्वासन अनुभाग अधिकारी भारत भूषण गुप्ता यांनी दिल्याचे निवेदनकर्त्यांनी सांगितले.

साहिल वाकोडे प्रकरणात उपस्थित करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करून सत्य समोर यावे आणि न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आता या निवेदनावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून काय कार्यवाही केली जाते, याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS