
मुंबई JPN NEWS - जुहू परिसरात सिने अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या कारच्या दिशेने गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने आणखी पाच आरोपींना अटक केली आहे. यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांच्या मदतीने दिल्लीतून चार आरोपींना, तर हरियाणा पोलिसांच्या मदतीने सोनीपत येथून एका आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
१८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी जुहू परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या कारच्या दिशेने गोळीबार केला होता. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू आहे. यापूर्वी राजस्थानमधील कोटा येथून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. हे तिघेही ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत आहेत.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हल्लेखोरांना शस्त्रपुरवठा आणि अन्य मदत करणाऱ्या टोळीची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर दिल्ली आणि हरियाणामध्ये कारवाई करून पाच जणांना अटक करण्यात आली.
पंजाबमधून शस्त्रे आणून मुंबईत पुरवली -
तपासात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोघांनी पंजाबमधील अमृतसर येथे जाऊन शस्त्रे मिळवल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर दोन महिला आरोपींनी रेल्वेने ही शस्त्रे मुंबईत आणून टोळीतील हल्लेखोरांकडे सुपूर्द केली. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक जण हल्लेखोरांसोबत मुंबईत राहून त्यांना मदत करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडून करण्यात येत आहे. ही कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपआयुक्त राज तिलक रौशन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली.


No comments:
Post a Comment