
मुंबई JPN NEWS - घाटकोपर पश्चिम येथील ऐतिहासिक खंडोबा टेकडी परिसराचा विकास करून नागरिकांसाठी अधिक सुरक्षित आणि सोयीसुविधांनी युक्त बनवण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या परिसरात तब्बल ५ कोटी ७१ लाख रुपयांची विकासकामे हाती घेण्याचे नियोजन असून, त्यामुळे अंतर्गत रस्ते, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि डोंगर उतारावरील सुरक्षिततेच्या प्रश्नांवर उपाययोजना होणार आहेत.
महापालिकेच्या ‘एन’ विभागामार्फत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांची ये-जा अधिक सुलभ व्हावी, यासाठी सिमेंट काँक्रिटचे अंतर्गत रस्ते बांधण्यात येतील. पावसाळ्यात पाणी साचू नये आणि त्याचा व्यवस्थित निचरा व्हावा, यासाठी नवीन पावसाळी गटारे उभारली जाणार आहेत. टेकडीच्या भागात माती खचणे किंवा दरड कोसळण्याचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यात येतील. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ठिकाणी संरक्षक जाळ्याही बसवण्यात येणार आहेत.
कंत्राटदाराची निवड; अंतिम मंजुरीची प्रतीक्षा -
या कामांसाठी महापालिकेने ई-निविदा प्रक्रिया राबवली होती. निविदेत सहभागी झालेल्या सहा कंपन्यांपैकी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करू शकलेल्या तीन कंपन्या अपात्र ठरल्या, तर तीन कंपन्या तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरल्या. आर्थिक निविदांची तपासणी केल्यानंतर ‘मे. एस. के. महालिंगम कन्स्ट्रक्शन’ या कंपनीने महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा ३.३३ टक्के कमी दराने बोली लावल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या कंपनीला कंत्राट देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
कंत्राटदार नियुक्तीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महापालिकेच्या स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. समितीची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होईल.
सहा महिन्यांत विकासकामे पूर्ण करण्याचे लक्ष्य -
संपूर्ण प्रकल्प सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या कामांमुळे खंडोबा टेकडी परिसरातील अंतर्गत रस्त्यांची स्थिती सुधारण्यासोबतच पावसाळ्यातील पाणी निचऱ्याची समस्या आणि डोंगर उतारावरील सुरक्षिततेच्या दृष्टीनेही मदत होण्याची अपेक्षा आहे. आता स्थायी समितीच्या मंजुरीनंतर काम प्रत्यक्षात कधी सुरू होते आणि नियोजित मुदतीत किती वेगाने पूर्ण होते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


No comments:
Post a Comment