
मुंबई JPN NEWS - शालेय पोषण आहारासाठी पुरविण्यात येणाऱ्या तांदळाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी किशोर पेडणेकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. धान्यात प्लास्टिकसदृश कण आणि निकृष्ट धान्य आढळत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर, विकासकामांच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
तांदळाच्या गुणवत्तेची प्रयोगशाळेत तपासणी करा -
शालेय पोषण आहारासाठी पुरविण्यात येणाऱ्या तांदळात प्लास्टिकसदृश दिसणारे बारीक कण, गहू आणि तुटलेले तांदळाचे दाणे आढळत असल्याचा दावा पेडणेकर यांनी केला. या धान्याच्या गुणवत्तेबाबत संशय असल्याने त्याची प्रयोगशाळेत तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.
लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित विषयात कोणतीही तडजोड होता कामा नये. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराची गुणवत्ता सुनिश्चित करावी, असे त्यांनी म्हटले.
धान्याच्या पुरवठा साखळीची चौकशी करा -
पोषण आहारासाठीचा तांदूळ कुठून खरेदी केला जातो, त्याची साठवणूक कोणत्या गोदामांत होते आणि त्याच्या गुणवत्तेची तपासणी कोण करतो, असे प्रश्न पेडणेकर यांनी उपस्थित केले. कारवाई करताना अनेकदा वाहनचालक किंवा क्लिनर यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाते; मात्र पुरवठादार, गोदामचालक आणि वितरण साखळीतील इतर जबाबदार व्यक्तींवर कारवाई होते का, याचीही चौकशी व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आनंदपूर इंडस्ट्री, मिराज इंडस्ट्री आणि पडघा येथील गोदामांचा उल्लेख करत त्यांनी धान्याच्या साठवणुकीपासून वितरणापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची तपासणी करण्याची मागणी केली. आकाश ग्राहक सहकारी संस्थेवरील कारवाईचा संदर्भ देत, अशा प्रकरणांत केवळ एका संस्थेपुरती कारवाई मर्यादित न ठेवता सर्व संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, असेही त्या म्हणाल्या.
संशयास्पद धान्याचा पुरवठा थांबवण्याची मागणी -
विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारातील चवळी, मटकी आणि इतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबतही पेडणेकर यांनी प्रश्न उपस्थित केले. आहार तयार करणाऱ्या संस्थांकडे आवश्यक स्वयंपाकघर आणि सुविधा आहेत का, तसेच त्यांच्या कामकाजाची नियमित तपासणी होते का, याची पडताळणी करण्याची मागणी त्यांनी केली.
तांदळाचे नमुने तातडीने तपासावेत, गुणवत्ता संशयास्पद आढळल्यास संबंधित धान्याचा पुरवठा थांबवावा आणि गैरप्रकार सिद्ध झाल्यास दोषींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करावी, असे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात केंद्र आणि राज्य सरकारची जबाबदारी काय आहे, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याचेही पेडणेकर यांनी सांगितले.
वर्सोवा लिंक रोडवरील वृक्षतोडीवर आक्षेप -
शालेय पोषण आहाराच्या प्रश्नासोबतच पेडणेकर यांनी विकासकामांमुळे होणाऱ्या वृक्षतोडीवरही टीका केली. वर्सोवा लिंक रोडच्या मार्गासाठी पर्यायी आराखड्याचा विचार केला असता, तर मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड टाळता आली असती, असे मत त्यांनी व्यक्त केले.
केवळ खर्च वाचवण्याच्या उद्देशाने रस्त्याचा मार्ग बदलल्यामुळे मोठ्या बागेचे नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी केला. या परिसरातील सुमारे ९८ वर्षे जुन्या वडाच्या झाडाचा उल्लेख करत त्यांनी वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास आणि पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली.
विकासकामांचे नियोजन करताना पर्यायी मार्गांचा विचार करून शक्य तितकी झाडे वाचविण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
‘भविष्यात ऑक्सिजनही विकत घ्यावा लागेल!’ -
वाढत्या वृक्षतोडीच्या परिणामांबाबत चिंता व्यक्त करताना पेडणेकर यांनी, विकासाच्या नावाखाली झाडे तोडली जात राहिली, तर भविष्यात नागरिकांना श्वास घेण्यासाठीही ऑक्सिजन विकत घ्यावा लागेल, असा इशारा दिला.
शालेय पोषण आहारातील धान्याच्या गुणवत्तेची पारदर्शक चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि विकासकामांमध्ये पर्यावरणाचे संरक्षण या तीन मुद्द्यांवर त्यांनी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी केली.


No comments:
Post a Comment