एआयच्या मदतीने नोकरीच्या संधी; मुंबईसह छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ब्लू डॉट एआय इकॉनॉमी’ प्रकल्प - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 October 2026

एआयच्या मदतीने नोकरीच्या संधी; मुंबईसह छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ब्लू डॉट एआय इकॉनॉमी’ प्रकल्प


मुंबई JPN NEWS - नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना उद्योगांमधील रोजगाराच्या संधींशी जोडण्यासाठी महाराष्ट्र सरकार कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘ब्लू डॉट एआय इकॉनॉमी’ हा डिजिटल उपक्रम राबवणार आहे. मुंबई उपनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने एकस्टेप फाउंडेशनसोबत बिगर-वित्तीय सामंजस्य करार केला आहे. याशिवाय, कौशल्य विकास आणि आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळासोबतही (NSDC) सामंजस्य करार करण्यात आला आहे.

मंत्रालयात बुधवारी (१४ ऑक्टोबर) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. या उपक्रमातून उमेदवारांची कौशल्ये आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची (MSME) मनुष्यबळाची गरज यांची कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने सांगड घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कौशल्यांनुसार रोजगाराच्या संधी शोधता येणार -
एकस्टेप फाउंडेशनने विकसित केलेला ‘ब्लू डॉट एआय इकॉनॉमी’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म उमेदवार, उद्योजक, उद्योग आणि विविध संस्थांना एकाच व्यासपीठावर जोडण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. उमेदवारांची कौशल्ये, वैयक्तिक गरजा आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक पातळीवरील रोजगाराच्या मागणीचा आणि उपलब्ध मनुष्यबळाचा शोध घेण्यास या प्रणालीची मदत होणार आहे.

या उपक्रमात रोजगारासोबतच उपजीविका, शिक्षण व प्रशिक्षण, सूक्ष्म आणि लघुउद्योगांचा विकास तसेच दिव्यांग व्यक्तींचा आर्थिक सहभाग वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे. प्रायोगिक प्रकल्पातून मिळणाऱ्या अनुभवाच्या आधारे भविष्यात या उपक्रमाचा विस्तार करण्याची शक्यता तपासली जाईल. या प्रकल्पासाठी निधीची तरतूद प्रस्तावित असल्याचेही सांगण्यात आले.

मुंबईत आंतरराष्ट्रीय कौशल्य केंद्र -
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळासोबत झालेल्या करारानुसार कौशल्य विकास योजनांचे मूल्यमापन, भविष्यकालीन कौशल्य प्रशिक्षण, उद्योगांशी संलग्न प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय मनुष्यबळ विकास आणि महिला उद्योजकता या क्षेत्रांत संयुक्तपणे काम केले जाणार आहे.

या योजनेअंतर्गत मुंबईत ‘स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या सहा विभागांमध्ये जागतिक कौशल्य प्रशिक्षण संस्था विकसित करण्याचे नियोजन आहे.

एआय, रोबोटिक्स आणि सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण -
उद्योगांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, ऑटोमेशन, ड्रोन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि डेटा विश्लेषण यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधींसाठी उमेदवारांना जर्मन, जपानी आणि इंग्रजी भाषांचे प्रशिक्षण देण्याबरोबरच परदेशी नियोक्त्यांशी समन्वय आणि रोजगार मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

याशिवाय, उद्योगांशी संलग्न कौशल्य प्रशिक्षण आणि शिकाऊ उमेदवारी कार्यक्रम बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. महिला उद्योजकांना बाजारपेठ, डिजिटल वाणिज्य, आर्थिक साक्षरता आणि मार्गदर्शनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही दोन्ही संस्था सहकार्य करणार आहेत.

या करारावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ. अमित सैनी, महाराष्ट्र राज्य कौशल्य सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माळी, कौशल्य आयुक्तालयाचे उपआयुक्त सचिन जाधव, एनएसडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण कुमार पिल्लई, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहायक आयुक्त (कौशल्य विकास) शैलेश भगत आणि एकस्टेप फाउंडेशनचे कार्यक्रम संचालक इकप्रित सिंग उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS