
दिवा JPN NEWS - दिवा पूर्वेतील आगासन रोड परिसरात पत्नीशी बोलण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ४० वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आल्याची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या हल्ल्यात तक्रारदार समीर छबन जाधव जखमी झाले असून, त्यांच्या जखमांवर सहा टाके घालण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात अनिकेत शिर्के याच्यावर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीतील माहितीनुसार, समीर जाधव हे दिवा पूर्व परिसरात राहतात. त्यांची पत्नी कोमल जाधव आणि मुलगा सिद्धांत यांच्यासोबत ते वास्तव्यास आहेत. अनिकेत शिर्के हा त्यांच्या परिचयाचा असून, गेल्या काही वर्षांपासून त्यांची ओळख असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
१४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दिवा आगासन रोडवरील गावदेवी गॅलेक्सी इमारतीजवळ पत्नीशी बोलण्याच्या कारणावरून वाद झाल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. या वादादरम्यान शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या घटनेत जाधव यांच्या डोळ्याजवळ, कानाजवळ, पाठीवर आणि हातावर दुखापती झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. जखमांवर सहा टाके घालण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.


No comments:
Post a Comment