Mumbai BMC News बोनस चर्चेतून २४ मान्यताप्राप्त संघटनांच्या महासंघाला वगळल्याचा आरोप; औद्योगिक न्यायालयात जाण्याचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 October 2026

Mumbai BMC News बोनस चर्चेतून २४ मान्यताप्राप्त संघटनांच्या महासंघाला वगळल्याचा आरोप; औद्योगिक न्यायालयात जाण्याचा इशारा


मुंबई JPN NEWS - मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षातील बोनस अर्थात सानुग्रह अनुदानाबाबत चर्चेला वेग आला असताना, मान्यताप्राप्त २४ कामगार संघटनांचा समावेश असलेल्या मुंबई महानगरपालिका कर्मचारी महासंघाला चर्चेपासून दूर ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. महासंघाला चर्चेसाठी निमंत्रित न केल्यास २ नोव्हेंबर २०२६ रोजी औद्योगिक न्यायालयात होणाऱ्या सुनावणीदरम्यान हा मुद्दा उपस्थित करण्याचा इशारा महासंघाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश देवदास यांनी दिला आहे.

यासंदर्भात त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख कामगार अधिकारी सुनील जांगळे यांना पत्र पाठवून महासंघाची भूमिका स्पष्ट केली आहे. बोनसबाबतची चर्चा सर्व संबंधित मान्यताप्राप्त संघटनांना विश्वासात घेऊन व्हावी, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

३२ पैकी २४ मान्यताप्राप्त संघटना महासंघाशी संलग्न - 
मुंबई महानगरपालिका कर्मचारी महासंघ हा मान्यताप्राप्त महासंघ असून, त्याच्याशी ३२ पैकी २४ मान्यताप्राप्त कामगार संघटना संलग्न असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. महासंघाच्या वतीने २०२५-२६ या आर्थिक वर्षातील बोनस अथवा सानुग्रह अनुदानाबाबतचे मागणीपत्र यापूर्वीच महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आले आहे.

असे असताना, चर्चेसाठी केवळ काही ठरावीक कामगार संघटनांना बोलावण्यात आल्याची माहिती मिळाल्याचे महासंघाने म्हटले आहे. २४ मान्यताप्राप्त संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महासंघाला बाजूला ठेवून चर्चा करणे ही कामगारांसाठी अनुचित प्रथा असल्याचा आक्षेप ॲड. देवदास यांनी नोंदवला आहे.

महापौरांच्या दालनातील बैठकीत सहभागी करून घेण्याची मागणी - 
सानुग्रह अनुदानाबाबत महापौरांच्या दालनात होणाऱ्या बैठकीस महासंघाला निमंत्रित करावे, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. बोनससारख्या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेताना कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मान्यताप्राप्त संघटनांना चर्चेत सहभागी करून घेणे आवश्यक असल्याची भूमिका महासंघाने मांडली आहे.

महासंघाला या बैठकीसाठी बोलावले नाही, तर २ नोव्हेंबर रोजी औद्योगिक न्यायालयात होणाऱ्या सुनावणीदरम्यान या प्रकाराची माहिती न्यायालयाला देण्यात येईल, असा इशाराही पत्रात देण्यात आला आहे.

आयुक्तांच्या निदर्शनास विषय आणण्याची मागणी - 
प्रमुख कामगार अधिकारी सुनील जांगळे यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात, बोनस आणि चर्चेच्या प्रक्रियेबाबत त्यांना माहिती नसल्यास तसेच उपआयुक्त (सामान्य प्रशासन) यांच्यामार्फत बैठक निश्चित केली जात असल्यास, ही बाब महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देणे ही प्रमुख कामगार अधिकारी म्हणून त्यांची जबाबदारी असल्याचे महासंघाने नमूद केले आहे.

त्यामुळे बोनसच्या चर्चेत महासंघाला सहभागी करून घेतले जाणार का आणि महापालिका प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेणार, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS