Mumbai महापालिका कर्मचाऱ्यांना ३३ हजारांचा दिवाळी बोनस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 October 2026

Mumbai महापालिका कर्मचाऱ्यांना ३३ हजारांचा दिवाळी बोनस


मुंबई JPN NEWS - बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावली २०२६ निमित्त ३३ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी बुधवारी (२८ ऑक्टोबर) केली. नोव्हेंबर महिन्याच्या नियमित वेतनासोबत ही रक्कम अदा करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

महापौरांच्या दालनात झालेल्या बैठकीत महापालिकेतील विविध पक्षांचे गटनेते, पदाधिकारी, प्रशासनाचे अधिकारी आणि कामगार-कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

मागील वर्षाच्या तुलनेत दोन हजारांची वाढ - 
महापालिकेच्या माहितीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ३३ हजार रुपये देण्यात आले होते. यंदाही ३३ हजार रुपये देण्यात येणार असल्याने मागील वर्षाच्या तुलनेत अनुदानाच्या रकमेत वाढ झालेली नाही. सानुग्रह अनुदानासोबतच सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV) आणि बालवाडी शिक्षिका व मदतनीस यांना भाऊबीज भेट देण्यात येणार आहे.

९३ हजारांहून अधिक जणांना लाभ - 
महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, नियमित वेतनश्रेणीतील अधिकारी-कर्मचारी, विविध शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण सेवक अशा एकूण ८८,७५६ जणांचा सानुग्रह अनुदानाच्या यादीत समावेश आहे. याशिवाय २,३९३ सामाजिक आरोग्य स्वयंसेविका आणि २,३६० बालवाडी शिक्षिका व मदतनीस यांना भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. अशा प्रकारे एकूण ९३,५०९ जणांना सानुग्रह अनुदान किंवा भाऊबीज भेटीचा लाभ मिळणार आहे.

बैठकीला प्रमुख पदाधिकारी उपस्थित -
या बैठकीला उपमहापौर संजय घाडी, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, सभागृहनेते गणेश खणकर, काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी, एआयएमआयएमचे गटनेते विजय उबाळे, मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार, समाजवादी पक्षाच्या गटनेत्या अमरीन अब्रहानी, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांच्यासह महापालिका प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी संघटनांचे नेते शशांक राव, अशोक जाधव, रमाकांत बने, प्रकाश जाधव, वामन कविस्कर आदी उपस्थित होते.

महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून सर्व संबंधित पदाधिकारी, प्रशासन आणि कर्मचारी संघटनांच्या समन्वयातून हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना दीपावलीचा सण आनंदात साजरा करता यावा, हा या निर्णयामागील उद्देश आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS