
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पथक गस्तीवर होते. त्यावेळी जोगेश्वरी बस डेपो परिसरात, एस. व्ही. रोडवरील मॅक कॅफेसमोर संशयित व्यक्ती अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत मोहम्मद कासिफ फारूख शेख याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
आरोपीकडून एकूण १,११३ ग्रॅम चरस जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत १ कोटी ११ लाख ३० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. आरोपी हा माझगावमधील घोडपदेव येथील मोदी कंपाउंड परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वांद्रेचे प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाच्या स्रोताबाबत तसेच त्याच्या विक्रीसंदर्भातील संभाव्य व्यवहारांबाबत तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


No comments:
Post a Comment