
मुंबई JPN NEWS - दुचाकीवरून जाताना रस्त्यावर पडलेली बॅग सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात जमा करून त्यातील चार लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज संबंधित युवकाला परत देत घाटकोपर पूर्व येथील पंतनगर पोलिसांनी प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून दिले आहे. बॅगेत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम होती. पोलीस कर्मचारी गगन गायकवाड आणि होमगार्ड माने यांनी दाखवलेल्या कर्तव्यनिष्ठेचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले.
पंतनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक युवक दुचाकीवरून जात असताना त्याची बॅग रस्त्यावर पडली. परिसरात गस्त घालत असलेले पोलीस कर्मचारी गगन गायकवाड आणि होमगार्ड माने यांच्या निदर्शनास ही बॅग आली. त्यांनी बॅग ताब्यात घेत ती पंतनगर पोलीस ठाण्यात जमा केली. बॅगेत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असल्याचे समोर आले.
दरम्यान, बॅग हरवल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित युवक ती शोधत पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी त्याची माहिती घेतली आणि बॅगेतील ऐवजाची खात्री केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार यांच्या उपस्थितीत बॅग आणि त्यातील मौल्यवान वस्तू युवकाला परत करण्यात आल्या. हरवलेला ऐवज सुरक्षितपणे परत मिळाल्याने युवकाला मोठा दिलासा मिळाला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार यांनी आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर या घटनेची माहिती दिली. बॅगेतील सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ऐवजाची किंमत चार लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.
पोलीस कर्मचारी गगन गायकवाड आणि होमगार्ड माने यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दखल घेतली. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग धनंजय कुलकर्णी, परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त विलास दातीर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले.
हरवलेली बॅग स्वतःकडे न ठेवता ती पोलिसांकडे जमा करून संबंधित व्यक्तीपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याच्या या कृतीतून पोलिसांची कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा अधोरेखित झाला आहे.


No comments:
Post a Comment