BEST बोनसवरून राजकीय श्रेयवाद; प्रसाद लाड यांच्या घोषणेनंतर समिती अध्यक्षांची पत्रकार परिषद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 October 2026

BEST बोनसवरून राजकीय श्रेयवाद; प्रसाद लाड यांच्या घोषणेनंतर समिती अध्यक्षांची पत्रकार परिषद


मुंबई JPN NEWS - बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसवरून आता राजकीय श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. बेस्ट समितीवर शिवसेनेचे अध्यक्षपद असताना भाजप नेते प्रसाद लाड यांनी बेस्ट भवनात जाऊन कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केल्याने या विषयाला राजकीय वळण मिळाले आहे. लाड यांच्या घोषणेनंतर बेस्ट समितीच्या अध्यक्षा कृष्णा विश्वासराव यांनी नाराजी व्यक्त केली असून, बोनसबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी बोनस मिळावा, अशी मागणी बेस्टमधील सर्वच कामगार संघटनांकडून करण्यात आली होती. या मागणीवर बेस्ट समितीच्या बैठकीतही चर्चा झाली होती. नियमानुसार, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसची घोषणा बेस्ट समिती अध्यक्ष आणि महाव्यवस्थापक यांच्या संयुक्तपणे केली जाते.

मात्र, भाजप नेते प्रसाद लाड यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापिका सोनिया सेठी यांची भेट घेतली. त्यानंतर बेस्ट भवनात कार्यकर्त्यांसह उपस्थित राहून त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला. बेस्ट समितीचे अध्यक्षपद शिवसेनेकडे असताना भाजप नेत्याने बोनस जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.

लाड यांच्या या घोषणेनंतर बेस्ट समितीच्या अध्यक्षा कृष्णा विश्वासराव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बेस्ट प्रशासनाकडून बोनसची अधिकृत घोषणा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बोनसच्या घोषणेचे श्रेय कोणाला मिळणार, यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय वादाची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.४५ वाजता बेस्ट समितीच्या अध्यक्षा कृष्णा विश्वासराव पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत त्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत भूमिका स्पष्ट करणार असून, अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे बेस्ट कर्मचाऱ्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS