महाराष्ट्र सर्कलमध्ये डाक विभागाच्या व्यावसायिक सेवांमध्ये २८ ते ३९ टक्क्यांपर्यंत वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 October 2026

महाराष्ट्र सर्कलमध्ये डाक विभागाच्या व्यावसायिक सेवांमध्ये २८ ते ३९ टक्क्यांपर्यंत वाढ


मुंबई JPN NEWS - भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये राष्ट्रीय डाक सप्ताह २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक टपाल दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र किसन जायभाये यांच्या हस्ते विशेष टपाल मुद्रा जारी करण्यात आली. यावेळी त्यांनी डाक विभागाच्या विविध व्यावसायिक सेवांमध्ये २८ ते ३९ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याची माहिती दिली. पार्सल, डाक सेवा, आंतरराष्ट्रीय डाक व्यवसाय तसेच डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा या क्षेत्रांमध्ये विभागाने प्रगती केल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र डाक परिमंडळाच्या कामगिरीचा आढावा सादर करण्यात आला. भारतीय डाक विभागामार्फत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध सेवा, नवीन उपक्रम आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराची माहिती देणारे सादरीकरणही करण्यात आले. डाक सेवा प्रत्येक पात्र ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन मुख्य पोस्टमास्टर जनरल जायभाये यांनी केले. यावेळी डाक सेवा संचालक (मुख्यालय) सिमरन कौर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे स्वागत करून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

महाराष्ट्र आणि गोव्यात ३.५९ कोटी सक्रिय खाती - 
महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमध्ये सप्टेंबर २०२६ अखेर डाक विभागाची एकूण ३.५९ कोटी सक्रिय खाती होती. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्ये १.९२ कोटी खाती असून, १.१४ कोटी लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाचा लाभ मिळत आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये ३० सप्टेंबरपर्यंत ८.३७ लाख आधार नोंदणी आणि अद्ययावत करण्याची कामे पूर्ण करण्यात आली. याच कालावधीत पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांशी संबंधित २.८२ लाख नियुक्त्यांचे कामकाज पूर्ण झाले.

डाक विभागाच्या वाहतूक आणि वितरण सेवांमध्येही मोठ्या प्रमाणात कामकाज झाले आहे. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत १०.२१ कोटी स्पीड पोस्ट टपाल वस्तूंचे बुकिंग व वितरण करण्यात आले. स्पीड पोस्ट पार्सलच्या माध्यमातून २६.९० लाख पार्सल, कराराधारित इंडिया पोस्ट पार्सल सेवेद्वारे १०.३९ लाख पार्सल, तर किरकोळ इंडिया पोस्ट पार्सल सेवेद्वारे १५.९५ लाख पार्सल हाताळण्यात आले.

आंतरराष्ट्रीय टपाल सेवांमध्येही विभागाने कामगिरी नोंदवली. आंतरराष्ट्रीय ट्रॅक्ड पोस्टल सेवा (ITPS) अंतर्गत १३.९० लाख टपाल वस्तूंचे बुकिंग व वितरण करण्यात आले, तर एक्स्प्रेस मेल सेवा (EMS) अंतर्गत १.१४ लाख टपाल वस्तू हाताळण्यात आल्या. विदेशी एअर पार्सल सेवेद्वारे २३ हजार पार्सलचे बुकिंग व वितरण करण्यात आले.

गणेशोत्सवात विशेष रात्रशिबिरांचा उपक्रम -
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात डाक विभागाने विशेष रात्रशिबिरांचा उपक्रम राबविला. गणेशोत्सवातील या शिबिरांमध्ये ११ हजार ३१३ पोस्ट ऑफिस बचत बँक खाती उघडण्यात आली. तसेच डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विम्याच्या ५१८ पॉलिसी जारी करण्यात आल्या. या पॉलिसींचा एकूण प्रीमियम १.२२ कोटी रुपये होता. याशिवाय ५७० बाल आधार नोंदणी व अद्ययावत सेवा, ५९१ सामान्य विमा सेवा आणि २१ ‘माय स्टॅम्प’ जारी करण्यात आले.

राष्ट्रीय डाक सप्ताहाच्या माध्यमातून डाक विभागाच्या बदलत्या भूमिकेची, नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या व्यापक सेवांची आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून सेवा अधिक सुलभ करण्याच्या प्रयत्नांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

९ ते १५ ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रम -
राष्ट्रीय डाक सप्ताहांतर्गत ९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा करण्यात आला. १२ ऑक्टोबर रोजी फिलाटेली अर्थात टपाल तिकिटांच्या संग्रहाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. महाराष्ट्र सर्कलमध्ये सध्या ११ हजार ७२० टपाल तिकीट संग्रह खाती कार्यरत आहेत. दुर्मीळ टपाल तिकिटे आणि टपाल साहित्याची प्रदर्शने, चर्चासत्रे व कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदा २५ विशेष टपाल आवरणे आणि सात कस्टमाइज्ड ‘माय स्टॅम्प’ जारी करण्यात आले आहेत.

१३ ऑक्टोबर रोजी आर्थिक समावेशन आणि सीसीएस दिन साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने प्रत्येक नागरिकापर्यंत आधुनिक आर्थिक सेवा पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे. पोस्ट ऑफिस बचत बँक, डाक जीवन विमा, ग्रामीण डाक जीवन विमा, आधार आणि सामाजिक सुरक्षा सेवांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. कोअर बँकिंग, इंटरनेट व मोबाइल बँकिंग, ई-पासबुक, आधार आधारित ई-केवायसी आणि परस्पर-संवादक्षम शाखा डाकघर सेवांमुळे ग्राहकांना अधिक सुलभ सुविधा मिळत आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत डिजिटल बँकिंग, घरपोच बँकिंग, यूपीआय, आधार आधारित पेमेंट सेवा आणि थेट लाभ हस्तांतरणाच्या सुविधा दिल्या जात आहेत. महाराष्ट्रातील ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांनाही या नेटवर्कचा उपयोग होत आहे.

या दिवशी प्रत्येक उपविभाग आणि प्रधान डाकघरात ‘डाक चौपाल’ आयोजित करण्यात येणार असून, त्याद्वारे बचत खाते, विमा आणि आधार सेवा नागरिकांच्या अधिक जवळ पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

१४ ऑक्टोबर रोजी डाक आणि पार्सल दिनानिमित्त सर्व रेल्वे डाक सेवा कार्यालयांतील छाननी सहाय्यकांसाठी छाननी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील डाक विभागाच्या प्रमुख २५ व्यावसायिक ग्राहकांसोबत बैठक घेऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

१५ ऑक्टोबर रोजी तंत्रज्ञान आणि नवोपक्रम दिन साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील सर्व प्रशासकीय कार्यालये तसेच निवडक डाकघरांमध्ये कर्मचारी आणि ग्राहकांसाठी तंत्रज्ञानविषयक प्रश्नमंजुषा आयोजित केली जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय डाक सेवांमधून व्यवसायवाढीवर भर - 
भारतीय डाक विभागाकडून आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट, आंतरराष्ट्रीय एअर पार्सल आणि आंतरराष्ट्रीय ट्रॅक्ड पॅकेट सेवा यांसारख्या सुविधांद्वारे परदेशात टपाल आणि पार्सल पाठविण्याची सेवा उपलब्ध करून दिली जाते. व्यक्ती, निर्यातदार आणि लघुउद्योजकांना परवडणाऱ्या दरांत आंतरराष्ट्रीय टपाल सेवा मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. निवडक डाकघरांमध्ये कागदपत्रांची पूर्तता, पॅकेजिंग, बुकिंग आणि प्रेषणासाठी एकाच ठिकाणी मदत उपलब्ध आहे.

आंतरराष्ट्रीय ट्रॅक्ड पॅकेट सेवा पाच किलोग्रॅमपर्यंतच्या लहान पार्सलसाठी उपलब्ध आहे. या सेवेअंतर्गत आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ८.७३ लाख, २०२४-२५ मध्ये ९.८१ लाख आणि २०२५-२६ मध्ये १४.२५ लाख टपाल वस्तूंची नोंद झाली. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या सहामाहीतच १३.९० लाख टपाल वस्तूंचे बुकिंग व वितरण झाल्याची माहिती विभागाने दिली.

राष्ट्रीय डाक सप्ताहाच्या माध्यमातून टपाल सेवांचा विस्तार, आर्थिक समावेशन, आंतरराष्ट्रीय व्यवसाय, तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राहकाभिमुख सुविधा यांना प्रोत्साहन देण्यावर महाराष्ट्र सर्कलचा भर राहणार आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS