
मुंबई JPN NEWS - मुंबईत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर हल्ले झाल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. भांडुपमध्ये मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत भरधाव दुचाकी पोलिसांच्या अंगावर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तर एम.आर.ए. मार्ग परिसरात नाकाबंदी दरम्यान दुचाकी अडवल्याच्या रागातून एका व्यक्तीने पोलिसावर तलवार उगारून मारहाण केल्याची घटना घडली. या दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भांडुपमध्ये पोलिसांच्या अंगावर दुचाकी घातल्याचा आरोप -
भांडुप पश्चिम येथील साउथ बॉन्ड परिसरातील मद्रास कॅफेजवळ २५ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता ही घटना घडली. पोलीस हवालदार आप्पासो संभाजी हजारे (वय ३७) हे सहकारी अधिकारी आणि अंमलदारांसह कायदेशीर कर्तव्य बजावत होते. त्यावेळी २७ वर्षीय आरोपीने काळ्या रंगाची बजाज पल्सर NS दुचाकी भरधाव वेगाने आणि विनापरवाना चालवत त्यांच्या अंगावर घातल्याचा आरोप आहे. या कृत्यातून पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०५१/२०२६ नोंदवण्यात आला आहे.
एम.आर.ए. मार्गावर पोलिसावर तलवार उगारली -
दुसरी घटना २५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे १ वाजण्याच्या सुमारास कल्पना जंक्शन, पी. डी'मेलो रोड येथे घडली. पोलीस कर्मचारी सचिन गोरख कोकरे (वय ३९) हे नाकाबंदीचे कर्तव्य बजावत होते. यावेळी कर्नाक बंदरच्या दिशेने उलट दिशेने येणाऱ्या दुचाकीला त्यांनी कारवाईसाठी अडवले. त्यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या ३५ वर्षीय आरोपीने जवळील छोटी तलवार काढून पोलिसाला जीवे मारण्याच्या उद्देशाने उगारल्याचा आरोप आहे. आरोपीने शिवीगाळ करून हाताने मारहाण केली आणि सरकारी गणवेश फाडून त्यांच्या कर्तव्यात अडथळा आणल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी एम.आर.ए. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही घटनांमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांसह लागू कायद्यांनुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.


No comments:
Post a Comment